ताज्या बातम्या

नेताजी सुभाष चंद्र बोस माहिती


(२३ जानेवारी १८९७ – १८ ऑगस्ट १९४५ ?). भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक श्रेष्ठ क्रांतिकारक नेते आणि आझाद हिंद सेनेचे सरसेनापती. ‘नेताजी’ ही त्यांना लोकांनी दिलेली उपाधी. सुभाषबाबूंचे घराणे मूळचे माहिनगरचे (बंगाल). त्यांचे वडील जानकीनाथ वकिलीच्या व्यवसायानिमित्त कटकला (ओरिसा) आले. तेथेच सुभाषचंद्रांचा जन्म झाला. आई प्रभावतीदेवींनी बालवयात त्यांच्यावर केलेले संस्कार त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या घडणीत महत्त्वाचे आहेत. रॉवेंशा विद्यालयाचे मुख्याध्यापक बेनी माधवदास यांचाही त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला.

सुभाषबाबूंवर स्वामी रामकृष्ण आणि विवेकानंद यांचा फार मोठा प्रभाव शाळेत असतानाच पडला होता. दोघांच्या अनेक ग्रंथांचे वाचन त्यांनी तेव्हा केले होते. मिशन शाळेत गोऱ्या व हिंदी विद्यार्थ्यांमध्ये करण्यात येणारा भेदाभेद आणि विवेकानंदांचे लिखाण यांमुळे राष्ट्रप्रेम निर्माण झाले व पुढे गोऱ्यांच्या उद्दाम वर्तनाचे (उदा., प्रा. ओटन) प्रसंग अधिकाधिक घडले तसतसे ते वाढत गेले. याउलट विवेकानंद-रामकृष्णांच्या ग्रंथांमुळे त्यांना अत्यंत उत्कट अशी धार्मिक ओढ वाटू लागली. वयाच्या पंधराव्या वर्षापासूनच ते कटक आणि नंतर कलकत्त्याला भेटणाऱ्या साधू, बैरागी, योगी इत्यादींना प्रश्न विचारून त्यांच्याकडून आपल्याला खरा मार्ग सापडेल का, याचा शोध घेऊ लागले. ध्यान, हटयोग यांतही त्यांना गोडी वाटू लागली. विषयासक्तीवर पूर्ण नियंत्रण मिळवून साक्षात्कार प्राप्तीचा मार्ग दाखविणारा कोणी गुरू त्यांना या दोन्ही शहरांत भेटला नाही.

कॉलेजमधील पहिले वर्ष संपल्यानंतरच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत सतराव्या वर्षी ते आणि त्यांच्यासारखे त्यांचे चारपाच मित्र गुरूच्या शोधार्थ निघाले. गया, काशी, हरद्वार, हृषिकेश, मथुरा, वृंदावन, दिल्ली, आग्रा इ. ठिकाणी ते सर्वजण हिंडले; परंतु हवा असलेला गुरू तर मिळाला नाहीच उलट तीर्थक्षेत्री जातिपातीचे प्रस्थ, शिवाशीव इ. पाहून त्यांचा भ्रमनिरास झाला. विवेकानंदांच्या शिकवणुकीने त्यांची मानवाच्या समानतेवरील श्रद्धा दृढ झाली.

प्रा. ओटन यांच्या व तशाच एका गोऱ्या प्राध्यापकाच्या उर्मट वर्तवणुकीने अपमानित झालेल्या प्रेसिडेंट कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हरताळ पुकारला. त्याचे नेतृत्व स्वीकारणे सुभाषबाबूंना भाग पडले. पुढील आयुष्याचे वळण लागण्याची ही नांदी होती; पण या प्रकरणी त्यांना महाविद्यालयातून काढून टाकण्यात आले. पुढे अशुतोष मुखर्जींच्या मदतीने त्यांना स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला (१९१७). ते तत्त्वज्ञान विषय घेऊन पहिल्या वर्गात बी.ए. झाले (१९१९). त्याच वर्षी वडिलांच्या इच्छेनुसार ते आय्.सी.एस्.साठी इंग्लंडला गेले. त्या वेळी असहकार आंदोलन सुरू झाले नव्हते. जालियनवाला बाग येथे काय घडले, त्याची पूर्ण कल्पना पंजाब बाहेरच्या लोकांना आली नव्हती. परीक्षेत यश मिळाल्यानंतर हळूहळू सर्व गोष्टी उजेडात आल्या. आंदोलन सुरू झाले, तेव्हा त्यांनी पहिली सक्तीची एक वर्षाची उमेदवारी न करता सरळ नोकरीचा राजीनामा देऊन स्वदेशाची वाट धरली (१९२१). या वेळी महात्मा गांधींच्या असहकार चळवळ जोरात होती. त्यांची भेट घेऊन पुढील दिशा समजावून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. महात्मा गांधीनीच त्यांना कलकत्त्याला चित्तरंजन दासांकडे (१९२१) पाठविले. मृत्यूपर्यंत सु. चार वर्षे सुभाषबाबूंचे राजकीय गुरू चित्तरंजनच होते. या सुमारास इंग्लंडच्या प्रिन्स ऑफ वेल्सच्या कलकत्त्यामधील आगमनावर बहिष्कार टाकण्याची मोहीम आखण्यात आली. सुभाषबाबूंनी तीत पुढाकार घेतला (१९२१). त्यात त्यांना चित्तरंजन दासांबरोबर सहा महिन्यांचा कारावास भोगावा लागला. तुरुंगात दासांच्या पुरोगामी विचारांचा सुभाषबाबूंवर फार मोठा परिणाम झाला. कारावासानंतर ते काही दिवस बेंगॉल नॅशनल महाविद्यालयाचे प्राचार्य आणि स्वराज्य या वृत्तपत्राचे संपादक होते. पुढे चित्तरंजन दास कलकत्ता महानगरपालिकेचे महापौर झाल्यावर सुभाषबाबूंकडे मुख्य अधिकाऱ्याची जबाबदारी आली. ब्रिटिश सरकारने सूडबुद्धीने खोटा आरोप लादून ऑक्टोबर १९२४ मध्ये त्यांना स्थानबद्ध केले. बंगाल प्रांतिक परिषदेमध्ये क्रांतिवीर गोपीनाथ सहा (जो पुढे फाशी गेला) याचा जाहीर गौरव करण्यात आला होता. परिषदेस स्वतंत्र पक्षाचे म्हणजे कौन्सिलमध्ये काम करणाऱ्या काँग्रेस गटाचे बहुसंख्य लोक होते. त्यांनीच बंगाल कौन्सिलचे कार्य अशक्य करून टाकले होते. त्यांना खच्ची करण्यासाठी फार व्यापक धरपकडी झाल्या व सर्वांवर, दहशतवादी आंदोलनाशी संबंधित असल्याचे आरोप करण्यात आले. सुभाषबाबूंना अलीपूर, बेऱ्हामपूर, कलकत्ता इ. शहरांतील तुरुंगात काही काळ ठेवून पुढे मंडाल्यासही पाठविण्यात आले. कारावासात त्यांनी इतिहास, धर्मशास्त्र, मानसशास्त्र इ. विविध विषयांचे वाचन केले. दरम्यान चित्तरंजन दास यांचे निधन झाल्याचे त्यांना समजले (१९२५). अशक्त प्रकृती व क्षयाचा विकार यांमुळे सुभाषबाबूंना मुक्त करण्यात आले (१९२७). भारतातील राजकीय परिस्थितीचा सु. सहा महिने अभ्यास करून नंतर ते सक्रिय राजकारणात पडले. ते बंगाल प्रांतिक काँग्रेस परिषदेचे अध्यक्ष झाले. त्यांनी यूथ लीग स्थापन करून तरुणांना संघटित केले. काँग्रेसचे सरचिटणीस म्हणूनही जवाहरलाल नेहरूंबरोबर त्यांची नियुक्ती झाली (१९२८). दोघांनी मिळून इंडिया इंडिपेंडन्स युथ लीगची स्थापना केली (१९२८). त्याच वर्षी कलकत्ता येथील अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मोतीलाल नेहरू यांनी वसाहतीच्या स्वराज्याची मागणी करणारा ठराव काँग्रेस अधिवेशनात मांडला. जवाहरलालांसह सुभाषबाबूंनी त्यास विरोध केला आणि पूर्ण स्वातंत्र्याची मागणी करणारा ठराव मांडावा असे सुचविले. पुढे १९३० च्या सविनय कायदेभंगाच्या वेळी सुभाषबाबूंना पुन्हा अटक झाली. गांधी –आयर्विन करारानंतर (१९३१) त्यांची मुक्तता झाली व ते कलकत्ता महानगरपालिकेचे महापौर झाले. भगतसिंग यांची फाशी वाचवू शकत नसल्यामुळे व प्रत्यक्ष काहीच सवलती न मिळाल्यामुळे गांधी-आयर्विन कराराला सुभाषबाबूंनी अत्यंत कडक शब्दांत जाहीर विरोध केला होता. तेव्हापासून महात्मा गांधी व सुभाषबाबूंचे मार्ग भिन्न झाल्यासारखे दिसतात. जानेवारी १९३२ मध्ये सशस्त्र क्रांतिकारक चळवळीशी संबंध जोडून सरकारने त्यांना पुन्हा स्थानबद्ध केले; पण प्रकृतीच्या कारणास्तव तुरुंगातून मुक्त करताना त्यांना देशातून हद्दपार केल्याचे सांगण्यात आले. उपचारासाठी परदेशी जाणे त्यांना भाग होतेच. १९३३-३६ अशी तीन वर्षे ते व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) येथे राहिले. या काळात त्यांनी यूरोपातील राजकीय परिस्थितीचा सर्वांगीण आढावा घेतला. फॅसिझम व साम्यवाद या दोन विचारसरणींतील उपयुक्त गोष्टी एकत्र करून एक नवीन विचारप्रणाली अनुसरावी, असे त्यांचे मत होते. त्यांनी डी व्हॅलेरा, केमाल आतातुर्क अशा नेत्यांना भेटून त्या दृष्टीने चाचपणीही केली. याच यूरोपच्या दौऱ्यात व्हिएन्ना येथे विठ्ठलभाई पटेलांचे सानिध्य त्यांना लाभले (एप्रिल –ऑक्टोबर १९३३). विठ्ठलभाईंनी आपल्या मृत्युपत्रामध्ये आपल्या संपत्तीचे विश्वस्त म्हणून त्यांना नेमले.

हद्दपारीच्या आज्ञेचा भंग करून सुभाषबाबू भारतात आले (१९३६). त्यांना पुन्हा पकडण्यात आले. १९३५ च्या कायद्यान्वये नव्या कौन्सिलच्या निवडणुका झाल्यानंतरच त्यांची मुक्तता करण्यात आली (१९३७). हरिपुरा येथे होऊ

सुभाषचंद्र बोस

घातलेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी राष्ट्रीय नियोजन समिती १९३७ च्या ऑक्टाबरमध्ये नियुक्त केली. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी संघराज्यात्मक घटनेचा प्रखर विरोध करून राष्ट्रीय सामर्थ्यवादावर भर दिला. देशाच्या परिस्थितीत काँग्रेसचे धोरण जहाल असावे व काँग्रेसने आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा बदलत्या राजकारणात अनुकूल फायदा करून घ्यावा, या उद्देशाने ते अध्यक्षपदासाठी पुन्हा उभे राहिले. महात्मा गांधींच्या विरोधास न जुमानता त्रिपुरा काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक त्यांनी लढविली व पट्टाभिसीतारामय्या यांचा पराभव करून ते अध्यक्ष झाले (१९३९). आपल्या अध्यक्षीय भाषणात ‘सहा महिन्यांत युद्धाचा भडका उडेल’, असे भाकित त्यांनी केले. या निवडणुकीमुळे म. गांधी नाराज झाले. त्यांनी हा आपलाच पराभव आहे, असे मानले. बहुसंख्य सभासदांनी गांधीचे नेतृत्व मान्य केल्यामुळे सुभाषबाबूंनी एप्रिलमध्ये अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि मेमध्ये फॉर्वर्ड ब्लॉकची स्थापना करून स्वमताचा प्रचार चालू ठेवला. काँग्रेसने सुभाषबाबूंविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करून बंगाल प्रांतिक परिषदेतून त्यांची उचलबांगडी केली व पुढे तीन वर्षे कोणत्याही पक्षीय अधिकारपदासाठी निवडणूक लढविण्यावर त्यांच्यावर बंदी घालण्यात आली. १९ आणि २० मार्च १९४० मध्ये फॉर्वर्ड ब्लॉक व किसान सभा यांचे संयुक्त अधिवेशन रामगढ येथे भरविण्यात आले व ६ एप्रिल १९४० पासून राष्ट्रीय आंदोलनाचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर नागपूर (१८ जून १९४० च्या) अधिवेशनात अस्थायी राष्ट्रीय सरकार स्थापन करण्याची मागणी करण्यात आली; परंतु संकल्पित सत्याग्रहाच्या पूर्वीच त्यांना स्थानबद्ध करण्यात आले (२ जुलै १९४०). आपल्याला मुक्त केले नाही, तर अन्नत्याग करू, अशी त्यांनी धमकी दिली. सरकारने त्यांना सोडून त्यांच्या राहत्या घरात नजरकैदेत ठेवले. आपण अध्यात्मसाधना करणार आहोत, असे भासवून त्यांनी एकांतवास पतकरला आणि एक दिवस वेषांतर करून भगतरामसह पेशावरमार्गे काबूल गाठले (२६ जानेवारी १९४१). तेथून ते जर्मनीत गेले. तेथील वास्तव्यात त्यांनी हिंदी लोकांना ब्रिटिशांविरुद्ध लढ्यास प्रवृत्त केले आणि बर्लिन आकाशवाणीवरून ते देशबांधवांना सातत्याने आवाहन करीत राहिले. हिटलरच्या भेटीनंतर निराश न होता त्यांनी पुढे मुसोलिनीची भेट घेतली; तथापि मुसोलिनीची हंगामी सरकार स्थापण्याची सूचना त्यांना एकूण राजकीय परिस्थितीचा विचार करता स्वीकारार्ह वाटली नाही. म्हणून त्यांनी हिंदी लोकांना संघटित करण्यावर भर दिला. जर्मनीत एमिली शेंक्ल या ऑस्ट्रियन युवतीने त्यांची चिटणीस म्हणून काम स्वीकारले. सुभाषबाबूंनी तिच्याशी गुप्तपणे विवाह केला. त्यांना अनिता ही मुलगी झाली.

जर्मनी-इटलीमधील भारतीय सैनिकांना भेटून त्यांनी आपले मनोगत सांगितले व ब्रिटिशांविरुद्ध संघटित होण्याचे आवाहन केले. त्या वेळी जपानने ब्रिटिशांविरुद्ध रशियामध्ये आघाडी उघडली होती. बँकाक येथे जून १९४२ मध्ये भारतीयांची एक परिषद भरली होती. त्यात सुभाषबाबूंना पूर्व आशियात येऊन नेतृत्व करण्याची विनंती केलेली होती. त्याप्रमाणे जर्मनीहून जपानला येताना ते द. आफ्रिका-मादागास्करपर्यंत जर्मन यूबोटीने व पुढे सुमात्रापर्यंत जपानी पाणबुडीने गेले व पेनँग ते टोकिओ हा प्रवास त्यांनी विमानाने केला (१६ मे १९४३). जपान येथे आल्यानंतर त्यांनी स्वातंत्र्यासाठी देशाबाहेर दुसरी आघाडी तेथे उघडली. २१ ऑक्टोबर १९४३ रोजी सिंगापूर येथे आझाद हिंद सरकारची स्थापना करण्यात आली. सुभाषबाबू स्वतः राष्टप्रमुख, पंतप्रधान, संरक्षण मंत्री व सरसेनापती झाले. या शासनाला जपान, जर्मनी, इटली, ब्रह्मदेश आदी अकरा राष्ट्रांनी मान्यता दिली. या सरकारने इंग्लंड-अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारून स्वतःची तिकिटे व नोटाही काढल्या. जपानने अंदमान, निकोबार व जित बेटांचा ताबा या सरकारकडे सोपविला. ब्रह्मदेशामधून ⇨आझाद हिंद सेना भारताच्या दिशेने पुढे गेल्या. इंफाळ येथे लढाईला तोंड फुटले; परंतु तेथे आझाद हिंद सेनेला नैसर्गिक आपत्तींमुळे माघार घ्यावी लागली. रंगून आकाशवाणीवरून सुभाषबाबूंनी भाषण करून ब्रिटिशांशी कोणत्याही प्रकारचा समझोता न करण्याचे, फाळणी न स्वीकारण्याचे व लढा चालू ठेवण्याचे देशबांधवांना आवाहन केले (१२ सप्टेंबर १९४४). शिवाय युद्धात पराजय होत असतानासुद्धा नीतिधैर्य खचू न देण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले. महायुद्धात जर्मनी-इटली व नंतर जपानचा पराभव झाला; जपानने १५ ऑगस्ट १९४५ रोजी शरणागती पतकरली. त्या वेळी त्यांनी रशियाला जाण्याचा निर्णय घेतला. मांचुरियाहून त्यांना धाडण्याची व्यवस्था फिल्ड मार्शल ताराऊ याने केली. सायगावहून १७ ऑगस्ट १९४५ रोजी त्यांनी प्रयाण केले. मार्गावर १८ ऑगस्ट रोजी तैपे (तैवान) येथील विमानतळावर विमानास अपघात होऊन त्यांचे निधन झाले, असे समजण्यात येते. या अपघाताची कारणे अशी होती : विमानात एकूण ९ माणसांऐवजी १३ उतारू घेतले होते. विमानतळ तुलनात्मकदृष्ट्या फार छोटा होता आणि या वेळी वैमानिकाची मनःस्थिती अस्थिर व भांबावलेली होती. शिवाय वैमानिकाने फॉर्मोसा विमानतळाचा कधीच अनुभव घेतला नव्हता.

जपानने शरणागती पतकरल्यामुळे मानसिक धक्का – २,६०० वर्षांत जपानचा हा पहिलाच पराभव होता. सरकार असून नसल्यासारखे – यामुळे निधनाची वार्ता जाहीर केली नाही. निधनाचे वृत्त दीर्घ काळ अज्ञात राहिल्यामुळे लोकांत पुढे शंका निर्माण झाली.

सुभाषबाबूंचे एकूण जीवनच देशभक्त क्रांतिकारकाचे व म्हणून रोमांचकारी आहे. परदेशात जाऊन इतर मित्रराष्ट्रांच्या साह्याने त्यांनी प्रतिसरकार स्थापन केले, हे त्यांच्या धडाडीचे, संघटना कौशल्याचे, समयसूचकतेचे व मुत्सद्देगिरीचे निदर्शक आहे.

दास्यमुक्तीसाठी आणि नंतरच्या प्रगतीसाठी त्यांनी अनेक योजना आखल्या आणि त्या कार्यवाहीत आणण्यासाठी अविश्रांत परिश्रम घेतले. प्रकृतीची पुरेशी साथ नसतानाही त्यांनी उपोषण–निदर्शनांपासून सशस्त्र युद्धापर्यंतचे सर्व मार्ग आचरणात आणले. त्यासाठी त्यांनी म. गांधीपासून स्वातंत्र्यवीर वि. दा.सावरकरांपर्यंतच्या सर्व नेत्यांचे प्रसंगोपात्त सहकार्य स्वीकारले. त्यांचा स्वभाव दृढनिश्चयी व प्रसंगी कठोरही होत होता; तथापि त्यांचे वागणे मात्र सौजन्यशील व सौहार्दाचे असे. मूळात त्यांचा कल आध्यात्मिक साधनेकडे होता. दूरदृष्टी, जबरदस्त, आत्मविश्वास, धडाडी आणि निर्भयता यांमुळे कोणत्याही प्रसंगी ते डगमगले नाहीत. आझाद हिंद सरकारच्या स्थापनेनंतर त्यांनी स्वीकारलेले राष्ट्रगीत हेच स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत बनले. त्यांची भाषणे, पत्रे, स्फुटलेखन इ. स्वातंत्र्योत्तर काळात समग्ररीत्या प्रसिद्ध झाले. ॲन इंडियन पिल्‌ग्रिम : ॲन् अनफिनिशड ऑटोबायॉग्रफी अँड कलेक्टेड लेटर्स – १८९७-१९२१ हे त्यांचे आत्मवृत्त प्रसिद्ध झाले आहे (१९६५).


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *