राज्याच्या फलोत्पादनाला चालना देण्यासाठी शासकीय व खासगी रोपवाटिकांनी संयुक्तपणे सुरू ठेवलेल्या प्रयत्नांना चांगले यश आले आहे. त्यातून आता राज्यात दोन कोटींपेक्षा जास्त कलमे व रोपांचा साठा तयार झाला आहे.फळबागांचा विस्तार झपाट्याने होत असताना दुसऱ्या बाजूला राज्यात रोगग्रस्त लागवड साहित्याची विक्री वाढलेली आहे. त्यातून कीड व रोगग्रस्त फळबागांची संख्याही वाढते आहे. रोगमुक्त रोपांचा वापर हाच उपाय आहे. त्यामुळे अनधिकृत रोपवाटिकांमधील तसेच कृषी विद्यापीठांनी शिफारस न केलेल्या फळपिकांचे लागवड साहित्य खरेदी करू नये, असा आग्रह फलोत्पादन विभागाने धरला आहे.राज्यात मान्यताप्राप्त रोपवाटिकांमध्ये सध्या १.८० कोटी कलमे आणि ३०.७२ लाख रोपे उपलब्ध आहेत. राष्ट्रीय रोपवाटिका संकेतस्थळावर रोपवाटिकांची नोंदणी व्हावी. तसेच राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाकडून मानांकन मिळविणाऱ्या रोपवाटिकांमधून प्राधान्याने कलमे व रोपांची उचल व्हावी, यासाठी कृषी आयुक्त सुनील चव्हाण व फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत.