ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

शिंदेच तुम्हाला समुद्रात बुडवतील! संजय राऊत यांचा फडणवीसांना सणसणीत टोला


भाजपकडून एकीकडे उर्दूला विरोध केला जात असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र उर्दू शेरोशायरीत गुंतले आहेत. फडणवीस म्हणातात, ‘मेरा पानी उतरता देख, किनारो पे घर मत बना लेना, मै समुंदर हू, लौट के जरूर आऊंगा… आणि मी आलो!’

पण येताना शिदेंना घेऊन आलो.’ मात्र आम्हाला खात्री आहे की, हे शिंदेच तुम्हाला समुद्रात बुडवतील. ‘आप वापस कभी नही आओगे,’ असा टोला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

भाजपने शिवसेनेला मुंबईत समुद्राच्या गोष्टी सांगू नयेत. इथे दोनच समुद्र आहेत. एक अरबी समुद्र आणि दुसरा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा. हा समुद्र उसळतच राहील. औरंग्या गुजरातेत जन्मलेला असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या अंगात औरंग्या संचारल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

भाजपकडून याआधी लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा जिंकेल, असा दावा केला जायचा. मात्र शुक्रवारी पाटण्यात सर्व विरोधक नुसते एकत्र आल्यानंतर लगेच भाजपच्या 100 जागा कमी झाल्या आहेत. खुद्द अमित शहा यांनीच हे वक्तव्य केले आहे. आम्ही एकत्र आल्यावर तुम्ही 150 चा आकडा पार केला तरी फार होईल, असा टोलाही त्यांनी लगावला.देशातील प्रमुख 14 राज्यांत भाजपचा थांगपत्ता नाही. महाराष्ट्रात तर नाहीच नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी विश्वाचेच काय देशाचेही नेते नाहीत, असा टोलाही त्यांनी हाणला.

कडवट शिवसैनिकांना टार्गेट करण्याचा डाव

भाजपकडून कडवट शिवसैनिकांना टार्गेट करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापरातून डाव सुरू असल्याचे माजी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या. गेल्या 25 वर्षांत शिवसेनेने मुंबईत केलेल्या कामांमुळे लोक पाठीशी आहेत. मात्र याच्या पोटदुखीतून आता शिवसैनिकांना अडकवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवसेनेच्या माध्यमातून झालेल्या कामांमुळे पाणी तुंबण्याच्या समस्या कमी झाल्या. अनेक मोठी कामे झाली. मात्र सध्या ‘नावडतीचे मीठ अळणीं’ असा प्रकार सुरू आहे. पण आपल्याला मुंबई जिंकायची आहे आणि आम्ही जिंकणारच. जनता तुम्हाला चांगलाच धडा शिकवेल, असा इशाराही त्यांनी दिला.

मी, माझे कुटुंब आणि भाजप खुली किताब

मी, माझे कुटुंब आणि माझा भाजप परिवार एक खुली किताब आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. फडणवीसांच्या कुटुंबातील चॅट बाहेर येत आहेत. जर त्यावर बोलावं लागलं तर त्यांना केवळ शवासन करावे लागेल, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

यावर ट्विट करून फडणवीस म्हणतात, ज्या व्हॉट्सऍप चॅटबाबत तुम्ही बोलताय ते आरोपपत्राचे भाग आहेत. न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहेत आणि जाणीवपूर्वक टाकले आहेत. कारण लपवण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही, पण घुसलोच तर त्यांना तोंड दाखवायलाही जागा उरणार नाही, असेही फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *