गुजरातमधील जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात, नुकसानग्रस्त भागांतील वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू

0
54
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

‘बिपरजॉय’ चक्रीवादळ आता क्षीण होत चालले आहे. त्यानंतर याचा सर्वाधिक तडाखा बसलेल्या गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात शनिवारी दैनंदिन जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली.

दुकाने, व्यावसायिक संकुले उघडण्यात आली. मात्र या चक्रीवादळामुळे प्रभावित झालेली अनेक शहरे आणि शेकडो गावांतील वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी अधिकारी-कर्मचारी अथक प्रयत्न करत आहेत.

हवामान विभागाने दिलेल्या अद्ययावत माहितीनुसार जखाऊ बंदराच्या किनारपट्टीवर गुरुवारी संध्याकाळी धडकलेले हे वादळ खोल दाबाच्या क्षेत्रात परिवर्तित झाले आहे. पुढे त्याचा प्रभाव आणखी कमी होईल मात्र तोपर्यंत गुजरातच्या उत्तर भागातील जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जखाऊ आणि मांडवी येथील वादळाने नुकसान झालेल्या भागाचा दौरा करणार आहेत. तसेच मदत आणि बचावकार्यातील कर्मचाऱ्यासंह भुजमध्ये आढावा बैठक घेतील.

अधिकाऱ्यांनी सांगितले, की चक्रीवादळ कच्छमधून गेल्यानंतर या प्रदेशात आता पाऊस कोसळत नाही आणि वाऱ्याचा वेगही लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. प्रशासनाने बहुतांश रस्त्यांवरून उन्मळून पडलेली झाडे हटवली आहेत. भुज आणि मांडवी शहरांसह अनेक गावांमध्ये वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे. कच्छ, देवभूमी द्वारका, जामनगर, मोरबी, जुनागढ, गीर सोमनाथ, राजकोट आणि पोरबंदर जिल्ह्यांमध्ये वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तब्बल एक हजार १२७ पथके कार्यरत आहेत. कच्छ जिल्ह्यात शनिवारी जनजीवन पूर्वपदावर येत असल्याचे दिसले. वादळाचा तडाखा बसणाऱ्या गावांतील राहणाऱ्या एक लाखाहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवले होते.

सहा तासांत वादळ क्षीण

हवामान विभागाने केलेल्या ‘ट्वीट’नुसार १७ जून रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी साडेआठ वाजता नैर्ऋत्य राजस्थान आणि आग्नेय पाकिस्तानलगत गुजरात आणि बाडमेरच्या दक्षिणेस सुमारे ८० किलोमीटर आणि जोधपूरच्या नैऋत्येस २१० किलोमीटरवर हे चक्रीवादळ एका खोल दाबात परिवर्तित झाले आहे. आगामी सहा तासांत ते आणखी क्षीण होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here