ताज्या बातम्या

लोकसभेपूर्वीच काँग्रेस नेत्यानं टाकला पहिला डाव; भाजप खासदाराला घेरण्याचा प्रयत्न, थेट विचारले 9 प्रश्‍न


 लोककसभा निवडणूक आता आठ-नऊ महिन्यांवर आली असून काँग्रेसकडून विशाल पाटील यांनी उमेदवारी मागत शड्डू ठोकला आहे.

सांगली : खासदार संजय पाटील यांनी गेल्या नऊ वर्षांत नेमके काय केले, असा सवाल करत काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील  यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.

कवलापूर विमानतळ, रांजणी ड्रायपोर्टसह महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे काय केले, हा कळीचा मुद्दाही विशाल यांनी उपस्थित करत खासदारांची कोंडी करण्याचा डाव टाकला आहे. लोकसभा निवडणूक आता आठ-नऊ महिन्यांवर आली असून काँग्रेसकडून विशाल पाटील यांनी उमेदवारी मागत शड्डू ठोकला आहे.

भाजप खासदार संजय पाटील तिसऱ्यांदा मैदानात उतरण्यास सज्ज झाले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष आखाड्यात लढत सुरु होण्याआधी आता खडाखडी झडली आहे. त्यात आघाडी घेत विशाल यांनी खासदार पाटील यांच्यावर नऊ प्रश्‍नांच्या फैरी झाल्या आहेत. गेल्या नऊ वर्षांच्या काळात आपण काय केले, असे विचारत खासदारांवर निशाणा साधला आहे.

गेल्या ९ वर्षांत सांगली जिल्ह्यातील कोणते प्रश्न लोकसभेत मांडले, किती चर्चेत भाग घेतला, किती उपस्थिती लावली? तरुणाच्या रोजगारासाठी कोणता मोठा उद्योग आणला किंवा प्रयत्न तरी केला? कवलापूर विमानतळ प्रश्नाचे काय झाले? रांजणी ड्रायपोर्ट कधी होणार? सांगली महापालिकेस केंद्रातून काय मदत आणली? सांगलीचा समावेश स्मार्ट सिटी योजनेत का झाला नाही?

कोरोना साथीच्या काळात आरोग्यसेवा व जनतेच्या सेवेसाठी काय केले? सांगली जिल्ह्यात दोनवेळा महापूर आला, त्यात तुम्ही जनतेची किती मदत केली, पूर येऊ नये म्हणून अलमट्टी विषय किती मांडला? संसद दत्तक ग्राम योजनेत किती गावांचा विकास केला? शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले का? आपली प्रॉपर्टी किती पट वाढली, असे नऊ प्रश्‍न उपस्थित करण्यात आले आहेत.

खासदारांनी स्वतः प्रयत्न करून केंद्रातून कोणती योजना आणली, हे जाहीर करायला हवे. जगाचा नकाशा दाखवून हे मी केले, ते मी केले, असे सांगून चालणार नाही. कवलापूर विमानतळ, रांजणी ड्रायपोर्टचे काय झाले, याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *