क्राईमताज्या बातम्यायवतमाळ

चालकास लुटणाऱ्या टोळीतील दोघांना अटक; न्यायालयाने दिली तीन दिवसांची कोठडी


शहरातील मुख्य बाजारपेठेत बॅंकेतून रोख रक्कम काढून घराकडे जात असणाऱ्या चालकाला सकाळी ११:४५ वाजता दुचाकीवर आलेल्या दोघांनी लुटले.

या गुन्ह्याचा तपास यवतमाळ शहर पोलिस करीत होते. शेगाव पोलिसांच्या ताब्यातून यवतमाळच्या प्रकरणातील दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना गुरुवारी न्यायालयापुढे हजर केले असता ८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

लक्ष्मीनारायण राधेश्याम प्रताप हे दालमिलमध्ये चालक म्हणून काम करतात. मुलीच्या लग्नासाठी तयारी सुरू होती. लक्ष्मीनारायण प्रताप व त्यांचा मुलगा हे दुचाकीवरून बॅंकेत आले. दोन लाख ७६ हजारांची रोख काढून ते घरी परत जात असताना सराफा दुकानासमोर त्यांना दोन दुचाकीस्वारांनी धक्का देत पैशाची बॅग हिसकावून पळ काढला. ही घटना १७ मार्च रोजी सकाळी ११:४५ वाजता घडली. मुलीच्या लग्नाच्या तयारीत असणाऱ्या पित्याला जोरदार धक्का बसला. हादरलेल्या अवस्थेतेच ते शहर पोलिस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. ज्या भागात घटना घडली, त्या मेनलाईन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली. लुटमारीचा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. त्यात आरोपींची दुचाकी स्पष्टपणे आली. हे फुटेज यवतमाळ पोलिसांंनी राज्यातील पोलिसांच्या ग्रुपवर व्हायरल केले. याच फुटेजच्या आधारावरून शेगाव पोलिसांनी सातजणांची टोळी जेरबंद केली. त्यांच्याजवळ काही रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, तवेरा कार हाती लागली.

लुटलेली रक्कम परत आणण्याचे आव्हान

शेगाव पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी जिगनेश उर्फ जिग्नू दिनेश घासी (४४) रा. गरीबदास चाळ कुबेरनगर अहमदाबाद गुजरात, अजय अशोक तमंचे (४२) रा. फ्री कॉलनी अहमदाबाद गुजरात यांना यवतमाळ पोलिसांनी लुटमारीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास शहर ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन खंडेराव व त्यांचे पथक करीत आहे. तीन दिवसाच्या पोलिस कोठडीत आरोपींकडून लुटलेले पैसे परत मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *