सातारा पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या बनावट सहीचा वापर; एकावर गुन्हा दाखल

0
68

सातारा पालिकेत अनेक घडामोडी घडत असतात. मात्र, त्या काही काळानंतर उघडकीस येतात. असाच एक प्रकार सध्या उघडकीस आला असून या ठिकाणी जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने सातारा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या बनावट सहीचाच वापर करण्यात आला आहे.

मुख्याधिकाऱ्यांची बनावट सही करून ना-हरकत दाखला तयार करून तो न्यायालयात सादर करण्यात आला. याप्रकरणी कोल्हापुरातील नेचर इन नीड सीबीएमडब्ल्यूटीएफ संस्थेच्या एकावर सातारा शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आप्पासो बळवंत जाधव (रा. कर्जगार चेंबर्स, इंजिनिअरिंग असोसिएशन समोर, शिवाजीनगर, कोल्हापूर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत सातारा पालिकेतील आरोग्य विभाग प्रमुख प्रकाश लक्ष्मण राठोड यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेलय माहितीनुसार, कोल्हापुरातील नेचर इन नीड सीबीएमडल्ब्यूटीएफ संस्थेस जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन करण्यासाठी असोसिएशन ऑफ हाॅस्पिटल ओनर्स सातारा यांच्या मालकीचा सोनगावमधील कचरा डेपो प्लांट चालविण्यासाठी देण्यात आलेला होता. संबंधित प्लांट चालविण्यासाठी सातारा पालिकेचे मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या ना-हरकत प्रमाणपत्रामध्ये त्यांनी फेरफार केली.

तसेच सातारा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या बनावट सहीचा दाखला तयार करून तो न्यायालयातही सादर केला. यामध्ये सातारा पालिकेने वीस वर्षे मुदतवाढ दिली आहे, असे नमूद केले. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर सातारा पालिकेच्या वतीने तक्रार नोंदविण्यात आली. त्यानंतर नेचर इन नीड संस्थेच्या पदाधिकाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here