दहशतवाद्यांनी केला पोलिस अधिकाऱ्याच्या घरावर अंदाधुंद गोळीबार..

पाकिस्तानच्या (Pakistan) खैबर पख्तुनख्वा प्रांतात आज (रविवार) काही दहशतवाद्यांनी (Terrorists) एका पोलीस (Police) अधिकाऱ्याच्या घरावर अंदाधुंद गोळीबार केला, यात आठ जण जखमी झाले आहेत.

अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या उत्तर वझिरीस्तान जिल्ह्यातील गुलाम खान भागात सहायक पोलीस उपनिरीक्षक (ASI) यांच्या घरावर दहशतवाद्यांनी हल्ला केला, असं स्थानिक पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं.

या हल्ल्यात एएसआय अधिकारी, दोन महिलांसह आठ जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी सांगितलं की, जखमींना हॉस्पिटलमध्ये नेणाऱ्या एका वाहनाचाही वाटेत स्फोट झाला. मात्र, अधिकाऱ्यांनी कसं तरी जखमींना हॉस्पिटलमध्ये नेण्यात यश मिळवलं. तीन जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं असून तपास सुरू केला आहे.

दरम्यान, उत्तर-पश्चिम भागात अज्ञात बंदूकधाऱ्यानं केलेल्या गोळीबारात एका ट्रान्सजेंडरचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोहाट जिल्ह्यात एका संगीत कार्यक्रमातून तीन ट्रान्सजेंडर घरी परतत असताना शनिवारी रात्री ही घटना घडली. तीन ट्रान्सजेंडरपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले, असं पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here