महाराष्ट्राचा चेहरा बदलण्यासाठी शैक्षणिक क्षेत्राचे योगदान अतिशय महत्वाचे – खा.शरदचंद्र पवार


महाराष्ट्राचा चेहरा बदलण्यासाठी शैक्षणिक क्षेत्राचे योगदान अतिशय महत्वाचे – खा.शरदचंद्र पवार

महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांच्या मागे सर्व सामान्य नागरिकांचे पाठबळ – खा.शरदचंद्र पवार

नाशिक :  शैक्षणिक क्षेत्राचे योगदान अतिशय महत्वाचे असून महाराष्ट्रात अनेक उत्तम शैक्षणिक संस्था काम करत आहे. या संस्थांच्या मागे राज्यातील सामान्य माणूस उभा आहे हे वेगळंपण आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांनी केले.

नाशिकच्या कवी कालिदास कला मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार साहेब यांच्या हस्ते मवीप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे नागरी सन्मान करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी शिक्षण तज्ञ डॉ.मो.स.गोसावी, माजी पालकमंत्री दादाजी भुसे, ज्येष्ठ नेते हेमंत टकले, आमदार माणिकराव कोकाटे, ॲड.जयंत जायभावे, ॲड.अविनाश भिडे, ॲड.आशिष देशमुख, ॲड.भगवान साळुंखे, ॲड. सतीश देशमुख,ॲड.हेमंत धात्रक, ॲड.विलास लोणारी, डॉ.अभिमन्यू पवार, माजी आमदार जयवंतराव जाधव, ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, डॉ.अविनाश धर्माधिकारी, परवेज कोकणी,ॲड. रवींद्र पगार, प्रा.बाळासाहेब पिंगळे, शैलेश गोसावी, उद्योजक दिपक बागड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी खा.शरदचंद्र पवार म्हणाले की, देशात नवीन शैक्षणिक धोरण आणले जात आहे. यामध्ये काही नवीन बाबी समोर येत आहे तसेच काही प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन या धोरणातील चांगल्या गोष्टी घेण्यासाठी चर्चा करावी. पुढची पिढी समृध्द होण्यासाठी या शैक्षणिक संस्थांचे योगदान महत्वाचे आहे. नवीन पिढी समृध्द होण्याबरोबरच नवंनवीन क्षेत्रात जाऊन काम करू शकली पाहिजे असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, देश शेतीप्रधान देश आहे. पूर्वी ३५ टक्के लोक शेती करत होते. आता ५६ टक्क्यांहून अधिक लोक शेती करता आहे. मात्र पूर्वी शेती क्षेत्र किती होते आणि आता किती आहे याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. शेतीवर अधिक बोजा असून शिक्षणाच्या माध्यमातून नवनवीन संशोधन करण्याची गरज आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणासाठी मोठ योगदान दिलं. शेतीला वैज्ञानिक दृष्टिकोन देऊन शेतीला समृध्द करण्याची दृष्टी दिली. त्यानुसार शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना विज्ञाननिष्ट दृष्टी द्यावी असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, नाशिकमध्ये गोखले एज्युकेशन संस्थेच्या वाटचालीत डॉ.मो.स.गोसावी यांचे योगदान अतिशय महत्वपूर्ण आहे. यासह मराठा विद्या प्रसारक समाज यासह अनेक संस्था कार्यरत आहे. मराठा विद्या प्रसारक संस्था ही महाराष्ट्राला प्रतिष्ठा देणारी, विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देणारी संस्था आहे. या संस्थेची धुरा नितीन ठाकरे सांभाळत आहे. यापुढील काळात जगभरातील विद्यापीठांशी जोडून संस्था काम करेल असे त्यांनी सांगितले. तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये राजकारण आणू नये एका चौकटीच्या बाहेर जाऊ नये असे आवाहन त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here