पत्नीला मारहाण केल्याच्या आरोपावरून क्रिकेटपटू विनोद कांबळीविरुद्ध गुन्हा दाखल

भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी याने मद्यधुंद अवस्थेत पत्नीला मारहाण आणि शिवीगाळ केल्याची घटना घटली होती. याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून कांबळी विरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. उपनगरातील वांद्रे येथील अधिकाऱ्यांनी रविवारी याविषयी माहिती दिली.

मुंबई : कांबळीच्या पत्नीने पोलिसात तक्रार केल्यानंतर रविवारी दोन पोलिस कर्मचारी त्यांच्या फ्लॅटवर गेले आणि त्यांना नोटीस बजावली. आरोपीला त्याचे मत मांडण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांपुढे हजर राहण्यास सांगितले. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. माहितीप्रमाणे ही घटना शुक्रवारी घडली, असे वांद्रे पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले. कांबळीची पत्नी अँड्रियाने पोलिस तक्रारीत आरोप केला आहे की, त्याने स्वयंपाकाच्या पॅनचे हँडल पत्नीवर फेकून मारले. त्यामुळे तिच्या डोक्याला दुखापत झाली.

पत्नीला मारहाण : ही घटना शुक्रवारी दुपारी 1 ते 1.30 च्या दरम्यान घडली. कांबळी त्याच्या फ्लॅटवर दारूच्या नशेत पोहोचला. यानंतर त्याने पत्नीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी उपस्थित असलेल्या त्यांच्या १२ वर्षांच्या मुलाने भांडणात मध्यस्ती केली. पण कांबळी स्वयंपाकघरात गेला आणि तुटलेल्या तव्याचे हँडल आणून पत्नीवर हाणले. त्यामुळे ती जखमी झाली, असे या अधिकाऱ्याने तक्रारीचा हवाला देत सांगितले. कांबळीची पत्नी नंतर वैद्यकीय तपासणीसाठी भाभा रुग्णालयात गेली. तिच्या तक्रारीच्या आधारे वांद्रे पोलिसांनी शुक्रवारी कांबळीविरुद्ध भारतीय दंड संहितेनुसार एफआयआर नोंदवला.

या कलमांतर्गत गुन्हे दाखल : आरोपीविरुद्ध कलम 324 (स्वैच्छिकपणे धोकादायक शस्त्रांनी दुखापत करणे) आणि 504 (शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान करणे) दाखल करण्यात आले असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये कांबळीला वांद्रे येथील निवासी सोसायटीच्या गेटवर कार घुसवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

विनोद कांबळीची कारला टक्कर : भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याने मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवताना एका गाडीला टक्कर मारली होती. त्यानंतर 27 फेब्रुवारी, 2022 रोजी त्याला वांद्रे पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला जामीनावर सोडण्यात आले होते. या घटनेचा व्हिडीओ समोर आला होता. विनोद कांबळीची त्या दिवसाची अवस्था दाखवणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. लाल शर्ट आणि हाफ पँट घातलेला विनोद या व्हिडीओमध्ये आपल्याला दिसत आहे. विनोद दारूच्या नशेत असून, तो त्या अवस्थेतच सोसायटीच्या बाहेर जातो आणि रस्त्यावरील कारला धडकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here