धडापासून शिर वेगळं मग खुलासा होतो एका भयानक प्रेम प्रकरणाचा व हत्याकांडाचा

धडापासून शिर वेगळं केलेल्या मृतदेहाच्या कपड्यांवरून कुटुंबियांनी आपला कुटुंब प्रमुख मरण पावल्याचं गृहीत धरलं. मृतदेहावर रीतसर अंत्यसंस्कार केले.
दहाव्या दिवशी दशक्रिया विधीदेखील केला पण अचानक मृत झालेली व्यक्ती जिवंत असल्याची माहिती पोलिसांना मिळते. पोलीस संबंधित व्यक्तीला अटक करतात आणि मग खुलासा होतो एका भयानक प्रेम प्रकरणाचा व हत्याकांडाचा. एखाद्या चित्रपटाच्या कथानकालाही लाजवेल अशी घटना पुणे जिल्ह्यातील चऱ्होली खुर्द या गावात उघडकीस आली आहे. या गावातील एका शेतकऱ्यानं आपले विवाहबाह्य संबंध यशस्वी करण्यासाठी दुसऱ्याच एका व्यक्तीचा खून करून आपल्या मृत्यूचा बनाव रचला.

सुभाष उर्फ केरबा थोरवे (वय 58 वर्षे) असं या आरोपी शेतकऱ्याचं नाव आहे. थोरवेनं 48 वर्षांच्या रवींद्र घेनंद (रा. धानोरी) यांचा खून केला आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चऱ्होली खुर्द आणि धानोरी ही गावं पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात येतात. आळंदीच्या संत ज्ञानेश्वर महाराज समाधीमंदिराजवळ असलेली या दोन्ही गावांमध्ये दोन किलोमीटर अंतर आहे. आरोपी थोरवे हा चऱ्होली खुर्दमधील शेतकरी आहे. याशिवाय तो इतर शेतकऱ्यांना जमिनीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टर आणि रोटाव्हेटर सेवादेखील देतो.

थोरवेच्या पत्नीनं दोन वर्षांपूर्वी आत्महत्या केलेली आहे. तर, धानोरी येथील रवींद्र घेनंद यांच्याकडे शेती आहे पण वर्षानुवर्षे ते ड्रायव्हर म्हणून काम करून उदरनिर्वाह चालवत होते. त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना गेल्या काही वर्षांपासून दारूचं व्यसन लागलं होतं. हेही Lonavla Video Viral : पुण्यातलं कोयता प्रकरण ताजं असतानाचं आता लोणावण्यात कोयत्याने मारहाण 17 डिसेंबर (2022) रोजी सकाळी काही स्थानिक रहिवाशांना चऱ्होली खुर्द येथील शेतात रोटाव्हेटरच्या शेजारी शीर नसलेला मृतदेह आढळला.

रोटाव्हेटर थोरवेचं असल्याचं निष्पन्न झालं. त्यावेळी थोरवे यांची दोन मुलं बापू आणि महेश यांनी कपड्यांवरून मृतदेह वडिलांचा असल्याचं ओळखलं. थोरवे हे चालत्या रोटाव्हेटरवर चुकून पडले असावेत, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, अशा प्राथमिक अंदाज लावण्यात आला. थोरवे कुटुंबियांनी अंत्यसंस्कार केले.

गावात होर्डिंग लावून 22 डिसेंबर रोजी इंद्रायणी नदीच्या काठी मोठा दशक्रियाविधीदेखील केला. याच दरम्यान, रवींद्र घेनंद 17 डिसेंबरपासून घरी आले नसल्याचं त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात आलं. पण, दारूच्या आहारी गेलेल्या घेनंद यांच्या कुटुंबियांसाठी हे काही नवीन नव्हतं. घेनंद यांचा मुलगा निखिल यांनी सांगितलं, “या पूर्वी दारू पिऊन ते अनेकदा घराबाहेर राहायचे.

पण दोन दिवस ते घरी परतले नाहीत. त्यांच्याकडे फोनही नव्हता. आजूबाजूच्या गावांमध्ये दोन दिवस शोध घेतल्यानंतर मी 19 डिसेंबर रोजी आळंदी पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार दिली. चौकशी दरम्यान पोलिसांनी आम्हाला त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज दाखवलं ज्यामध्ये माझे वडील सुभाष थोरवे सोबत ट्रॅक्टरमधून 16 डिसेंबर रोजी जाताना दिसत होतं.

आम्ही थोरवेला ओळखत होतो. तो अनेकदा माझ्या वडिलांसोबत आमच्या घरी येत असे. मात्र, थोरवेचा मृत्यू झाला होता आणि माझे वडील बेपत्ता होते. त्यामुळे थोरवेच्या मृत्यूमागे माझ्या वडिलांचा हात आहे, अशी चर्चा गावात सुरू झाली होती.

पण, मला त्यात काहीतरी गडबड वाटत होती.” 26 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आलेल्या पोलीस तपासानुसार, थोरवेचा कथित मृत्यू आणि घेनंद यांच्या बेपत्ता असण्यामागे एक नियोजित कट होता. तपासाचा भाग असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं सांगितलं, “16 डिसेंबर रोजी दुपारी धानोरी गावातील क्रिकेट सामन्यादरम्यान थोरवे यानं घेनंद यांची भेट घेतली होती. त्यानंतर दोघेजण ट्रॅक्टरवरून चऱ्होली येथील शेतात जाण्यास निघाले. वाटेत थोरवेनं घेनंद यांना दारू विकत घेण्यासाठी पैसे दिले.

घेनंद यांनी दारूच्या तीन बाटल्या खरेदी केल्या होत्या. थोरवे आणि घेनंद हे दोघे त्या शेतात गेले ज्याच्या मालकांनी थोरवेला मशागतीचं काम दिलं होतं. त्या दिवशी रात्री नऊ वाजेपर्यंत दोघांनी शेतात मशागत केली. त्यावेळी घेनंद पूर्णपणे दारूच्या नशेत होते.” आळंदी पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक सुनील गोडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “थोरवेनं गवत कापण्याच्या धारदार विळ्यानं घेनंद यांचं डोकं धडापासून वेगळं करून खून केला.

त्यानंतर डोकं नसेलल्या घेनंद यांच्या शरीरावर आपले कपडे घातले आणि मृतदेह रोटाव्हेटरच्या खाली ठेवला. हा अपघात आहे असं वाटावं म्हणून तो मृतदेह आणखी विद्रुप केला. स्वत:चा फोनही त्याच ठिकाणी ठेवला. त्यानंतर घेनंद यांचं डोकं, कपडे आणि धारदार विळा एका पडक्या विहिरीत टाकून दिले.” सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा काटे म्हणाल्या, “थोरवेनं आपल्या प्रेमसंबंधासाठी ही सर्व गोष्ट रचली होती.

घेनंद यांच्या खून करण्याच्या काही दिवस अगोदर आरोपीनं प्रेमसंबंध असलेल्या महिलेकडे 35 हजार रुपये दिले होते. घेनंद यांची हत्या केल्यानंतर थोरवे कपड्यांशिवाय काही अंतर चालत गेला. वाटेत त्यानं लोकांकडून पँट आणि शाल घेतली आणि थेट आपल्या प्रेयसीच्या घरी गेला. त्यानंतर ते दोघे जेजुरीला गेले व तिथे काही दिवस राहिले.” जेजुरीत असताना थोरवेनं संबंधित महिलेला घडलेला प्रकार सांगितला.

थोरवेनं खून केल्याचं समजताच ती महिला घाबरली आणि तिला परत घरी सोडण्याचा आग्रह धरला. 23 डिसेंबर रोजी थोरवेनं तिला घरी सोडलं आणि रात्री 20 किलोमीटर पायी चालत शेल पिंपळगाव येथील आपल्या चुलत बहिणीचं घर गाठलं. ‘मृत’ चुलत भावाला जिवंत पाहून त्याची चुलत बहीण बेशुद्ध पडली. 24 डिसेंबर रोजी सकाळी तिने थोरवेच्या कुटुंबियांना, गावातील लोकांना आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली.

26 डिसेंबर रोजी, खून आणि पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी थोरवेला अटक केली. त्याच्या कबुलीजबाबाच्या आधारे पोलिसांनी घेनंद यांचं डोकं, त्यांचे कपडे आणि थोरवेनं वापरलेलं हत्यार विहिरीतून जप्त केलं. त्याला 27 डिसेंबर रोजी न्यायालयात हजर केलं असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी ज्या महिलेसोबत तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता तिचा जबाब नोंदवला.

या सर्व प्रकरणामुळे आरोपीच्या कुटुंबालादेखील मोठा धक्का बसला आहे. थोरवेचा मुलगा महेश म्हणाला, “आम्ही या क्षणी कोणाशीही बोलण्याच्या स्थितीत नाही. आम्ही काय अनुभवलं आहे ते मी सांगू शकत नाही. योग्य वेळी आम्ही बोलू.” मृत रवींद्र घेनंद यांची पत्नी मीना म्हणाली, “मला दोन मुलं आणि एक मुलगी आहे. या क्रूर कृत्यामुळे मुलांचे वडील आणि नातवंडांचे आजोबा त्यांच्यापासून कायमचे दूर गेले. मी प्रार्थना करते की, कोणालाही कधीही अशा धक्कादायक परिस्थितीतून जावं लागू नये.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here