अपेक्षाभंग झाला..!. विजयाचे फटाके फुस्स झाले, ढोलताशावाल्यांना गाशा गुंडाळायला लागला

बीड : केज तालुक्यातील चिंचोलीमाळी येथील निकाल जाहीर होण्यापूर्वीच काही उत्साही कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमावर आपला सरपंच विजयी झाल्याची चुकीची पोस्ट टाकली.
त्यामुळे इकडे गावात विजयाचा जल्लोष सुरू झाला. वाजत गाजत विजयी मिरवणूक निघाली. शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. हा सारा आनंदोत्सव सुरू असतानाच आपला उमेदवार पराभूत झाल्याचा संदेश मिरवणूक चालू असतानाच धडकला. पराभूत झाल्यामुळे सर्वांचा अपेक्षाभंग झाला.

२० डिसेंबरला बीड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणीची धामधूम सुरू होती. चिंचोलीमाळी ग्रामपंचायत मतमोजणीला उशीर होत असल्यामुळे तेथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका उत्साही कार्यकर्त्याने सरपंच म्हणून राष्ट्रवादीच्या सोनाली पवार यांच्यासह ९ उमेदवारही विजयी झाल्याची चुकीची पोस्ट व्हाॅट्सॲपवर टाकली. त्यामुळे अधिकृत निकाल जाहीर होण्यापूर्वीच गावात विजयी मिरवणूक काढून विजयाचा जल्लोष सुरू केला. सरपंच पती शंकर ऊर्फ पवन पवार यांच्यावर व्हॉट्सॲपवरून अभिनंदनाचा वर्षावही सुरू झाला.

निकालानंतर कार्यकर्त्यांचा अपेक्षाभंग
केज शहरातून लाईव्ह मीडियावाल्यांनीही त्यांना विजयी म्हणून जाहीर करून टाकले. चिंचोलीमाळी ग्रामपंचायतीचा अधिकृत निकाल दुपारी ३:३० वाजता जाहीर झाला. यावेळी सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपच्या रोहिणी देशमुख विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले आणि राष्ट्रवादीच्या सोनाली पवार, त्यांचे पती शंकर ऊर्फ पवन पवार आणि पॅनल प्रमुखांसह सर्वच कार्यकर्त्यांचा अपेक्षाभंग झाला..!. विजयाचे फटाके फुस्स झाले, ढोलताशावाल्यांना गाशा गुंडाळायला लावला आणि मिरवणूक अर्ध्यातच आटोपती घ्यावी लागली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here