बीड जिल्ह्यामध्ये लग्नाळू पोरांना फसवून बनावट लग्न लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश आठ दिवसात दोन लग्‍न

नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

बीड : बीड जिल्ह्यामध्ये लग्नाळू पोरांना फसवून बनावट लग्न लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात बीड पोलिसांना यश आले आहे.
विशेष म्हणजे आत्तापर्यंत या टोळीने अनेकांना लाखों रुपयांचा गंडा घातला आहे. यात लग्नातील आई, भाऊ बनावट नाते असल्याची माहिती उजेडात आली आहे. खोट्या (Marriage) लग्नाची खरी गोष्ट…नेमकी काय आहे?

बीड (Beed) जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांमध्ये लग्न करून आलेल्या नव्या नवरीने दागिण्यासह धूम ठोकल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी बीड (Beed News) शहर पोलीस ठाणे आणि नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे बीडसह संपूर्ण महाराष्ट्रात लग्नाळू पोरांना फसवणारी टोळी कार्यरत असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर हा तपास करताना अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. आधार कार्ड बनावट, नातेही बनावट, आई-वडील आणि भाऊ हे देखील बनावट तर एजंट मार्फत हा लुटीचा खेळ चालत आहे.

आठ दिवसात दोन लग्‍न

अडीच लाख रुपये देऊन लग्न लावून मोठ्या हौसेने आणलेली नवरी करवलीसह पळून जाण्याच्या प्रयत्नात नवरदेवाने पकडून बीड शहर पोलिसांच्या स्वाधीन केली होती. यानंतर बनावट लग्न लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला होता. बीड जिल्ह्यात 8 दिवसात दोन बनावट लग्नाच्या घटना समोर आल्याने मोठी टोळी कार्यरत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. या प्रकरणात बीड शहर पोलिस ठाण्यात नवरीसह 7 जणांना अटक केली. नवरी अल्पवयीन निघाली असून लग्नातील आई, भाऊ बनावट असल्याची माहिती उजेडात आली आहे.
लग्‍नाच्‍या दुसऱ्याच दिवशी प्रकार समोर

बीड जिल्ह्यात लग्नाळू तरुणांना फसवणारी टोळी सक्रिय आहे. शहरातील एका 32 वर्षीय तरुणाचा विवाह मध्यस्थामार्फत औंढा नागनाथ (जि. हिंगोली) येथील तरुणीशी जुळवला होता. 3 डिसेंबरला वसमत येथे शंभर रुपयांच्या मुद्रांकावर लग्न उरकले. त्यासाठी मध्यस्थाने अडीच लाख रुपये घेतले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी नवरीने करवली म्हणून आलेल्या मीना बळीराम बागल हिच्यासोबत पलायनाचा प्रयत्न केला. मात्र नवरदेवाने त्यांना पकडून शहर पोलिसांच्या स्वाधीन केले होते. अधिक चौकशीत बनावट लग्न लावणाऱ्या टोळीचा हा कारनामा असल्याचे स्पष्ट झाले.
नावे सांगितली खोटी, नातेही बनावट असल्याच उघड झाले आहे. मुक्तीराम गोपीनाथ भालेराव (वय 31, रा. रिधोरा, जि. परभणी), प्रभाकर शिवाजी दशरथे ऊर्फ आकाश बालाजी माने (वय 35, रा. जोड परळी, जि. परभणी), विनोद किसन खिलारे (वय 44, रा. शिवणी बु. जि. हिंगोली), जयशीला प्रभाकर कीर्तने (वय 35, रा. अस्वला, जि. हिंगोली), पूजा कचरू निलपत्रेवार (वय 27, रा. तालाकट्टा, जि. परभणी) अशी आरोपींची नावे आहेत. लग्नात यातील जयशीला कीर्तनेने नवरी मुलीची आई, तर प्रभाकर दशरथे याने भावाची भूमिका केली होती. त्या दोघांनी नावे देखील खोटी सांगितल्याचे निष्पन्न झाले आहे.

अंगावरील एक लाखाच्या दागिन्यासह पसार

तर दुसऱ्या घटनेत बीड तालुक्यातील देवी बाभुळगाव गावात एका एका लग्नाळू तरुणाकडून लग्नासाठी 2 लाख रुपये उकळले. त्यानंतर लग्न लावून आणलेली नवरी बाथरूमला जाते म्हणुन रात्रीतून अंगावरील एक लाखाच्या दागिन्यासह पसार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी लुटारू नवरीसह चौघांवर गुन्हा नोंद झाला आहे. या दोन्ही प्रकारामध्ये फसवणूक करणारी एकच टोळी असल्याचा संशय पोलीसांना आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here