गांभीर्य हवा प्रदूषणाचे… भाग ३.


गांभीर्य हवा प्रदूषणाचे… भाग ३.

हवा प्रदूषणाचे आरोग्यांवर जसे विपरीत परिणाम आहेत तसे अनेक सामाजिक व आर्थिक दुष्परिणाम सुद्धा आहेत, पण त्याकडे दुर्लक्ष होत आहे. हवा प्रदूषणाचा फटका जसा आरोग्याला, संपत्तीला आणि आर्थिक उलाढालीला बसतो, तसाच तो हवामानात बदल घडविण्यासाठी सुद्धा कारणीभूत ठरतो. हवामान बदलाची नैसर्गिक प्रक्रिया बाधित होते. काही भागात तर प्रदूषणामुळे लोकांना नेहमीच श्वसनाच्या रोगांचा आणि आजारीपणाचा सामना करावा लागतो. हवा प्रदूषित भागात मृत्यूदरात वाढ होते. औद्योगिक वाढीबरोबरच प्रदूषण नियंत्रण यंत्रणा राबविल्यास हे टाळता येणे सहज शक्य आहे. गेल्या वीस वर्षात औद्योगिक प्रगती समाधानकारक झाली असली, तरी प्रदूषण नियंत्रण यंत्रणा तुटपुंजी असल्याने, हवा प्रदूषण नियंत्रण करण्यात अपयश आल्याचे जाणवते. लान्सेटच्या अहवालाचे सहलेखक फिलिप लॉन्ड्रीगन यांच्या मते कडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार 2019 मधील 4.5 दशलक्ष मृत्यू, 2015 मधील 4.2 दशलक्ष मृत्यू, आणि 2000 सालचे 2.9 दशलक्ष मृत्यू केवळ वायू प्रदूषणामुळे झाले आहेत. विषारी वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूच्या आकड्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे 2000 साली हे प्रमाण 3.8 दशलक्ष होते तर 2019 मध्ये हे प्रमाण वाढून 6.3 दशलक्ष इतके झाले. लान्सेटच्या अहवालाच्या सहलेखका रचेल कुपका आणि नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रदूषणामुळे बाधित फुफुसांशिवाय हृदयाला सुद्धा धोका निर्माण होतो. हृदयाच्या कार्यात अनेक समस्या निर्माण होतात. वायू प्रदूषणामुळे धडधाकट व्यक्तीला अनपेक्षित हृदयविकाराचा झटका ही येऊ शकतो. थोडक्यात, वायु प्रदूषण हे शहरी भागातील लोकांसाठी आणि एकूणच समाजासाठी मोठे आव्हान आहे, असे म्हणायला हरकत नाही. थंडीच्या हंगामात वातावरणात गारवा असल्यामुळे प्रदूषकांचं हवेतील पसरणं कमी होऊन वातावरणात हवा प्रदुषाकांची घनता वाढते, त्यामुळे वायू प्रदूषणात वाढ होते. ही वायू प्रदूषके श्वासोश्वासाद्वारे शरीरात गेल्यामुळे श्वसनाच्या रोगांमध्ये, प्रामुख्याने पीएम २.५ इतक्या अतिसूक्ष्म कणांमुळे अधिक धोका निर्माण होतो. जर एखाद्याला दम्याचा त्रास असेल, तर ही समस्या वेगाने बळावते आणि अस्थमाचे अटॅक येण्याचा संभव असतो. अनेकांना प्रदूषित हवेमुळे श्वास घेण्यास त्रास होतो, किंबहुना प्रसंगी रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येते. यावर साधा सोपा उपाय म्हणजे व्यक्तिगत पातळीवर काही पथ्ये पाळणे गरजेचे आहे. आपण घराबाहेर जाताना शक्यतो, मास्क वापरले पाहिजेत. धूळ, धूर आणि धूक्यापासून स्वतःचे संरक्षण करूनघेण्यासाठी योग्य ती काळजी घेतली पाहिजे आणि योग्य ते उपाय योजले पाहिजेत. ज्या भागात अधिक हवा प्रदूषण आणि धूके आहे, त्या भागात शक्य असल्यास जाण्याचे टाळले पाहिजे. दम्याचा त्रास असल्यास, नेहमीच काळजी घेण्यासाठी इन्हेलर सारखी वैद्यकउपकरणे वापरात असतील तर ती सोबत ठेवली पाहिजेत. शासोश्वास घेण्यात अधिक त्रास जाणवत असेल तर डॉक्टर किंवा तज्ञांचा सल्ला घेतलाच पाहिजे.

रासायनिक प्रदूषकांमुळे होणारे मृत्यूचे आकडे तातडीने लोकांसमोर येत नाहीत. अर्थातच, या रासायनिक प्रदूषकांच्या विषारीपणाची सखोल चाचणीही होतेच असे नाही. अशा संथ मृत्यूमुळे समाजासह औद्योगिक जगतालाही आर्थिक फटकाही बसतोच. कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या कार्यक्षमतेवर अनिष्ट परिणाम होतो. उद्योजकांनी त्यांच्या उत्पादनात लक्ष देण्याइतकेच लक्ष जर प्रदूषण नियंत्रण यंत्रणेकडे दिले तर हे टाळता येणे शक्य आहे. हवा प्रदूषण आणि त्यामुळे होणारे मृत्यू, तसेच सामाजिक व आर्थिक नुकसान टाळण्यासाठी तातडीने हवा प्रदूषण रोखण्याची गरज आहे. त्यासाठी वैज्ञानिक आणि धोरणात्मक बदल करणे, त्यासाठी विषय तज्ञांचा सल्ला वेळोवेळी घेऊन कृती करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. या कामात सामाजिक संस्थांनी देखील पुढाकार घेणे आवश्यक आहे. सरकार आणि सामाजिक संघटना यांच्या परस्पर समन्वयाने पुढाकार घेतल्यास या प्रश्नावर नियंत्रण मिळविले जाऊ शकते. औद्योगिक प्रगती, योग्य पर्यावरण धोरण, संशोधित विज्ञान, पूरक प्रदूषण नियंत्रण यंत्रणा आणि सरकारचे धोरण यांची योग्य सांगड घालून औपचारिक पद्धतीने विकास साधने गरजेचे आहे. म्हणूनच, सामाजिक बांधिलकी असलेल्या संघटनांच्या माध्यमातून औपचारिक व्यासपीठ निर्माण केले पाहिजे. अशा सामाजिक बांधिलकी असलेल्या संघटनांमध्ये पर्यावरण अभ्यासकाचा समावेश असला पाहिजे. सरकारच्या धोरणामध्ये प्रभावशाली प्रदूषण नियंत्रण संशोधनाला योग्य वाव असला पाहिजे, आणि सरकारने पूरक संशोधनाला चालना दिली पाहिजे. प्रदूषण नियंत्रण संशोधनाला योग्य निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. हवा प्रदूषण नियंत्रणासाठी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय अभ्यासाबरोबरच स्थानिक अभ्यास सुद्धा महत्त्वाचे मानले पाहिजेत.

प्रा.डॉ.बी.एल.चव्हाण, (मो. ९८८१४२४५८६) पर्यावरणतज्ञ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here