तरूणाचा धारदार हत्यार आणि दगडाने वार करून निर्घृण खून

जळगाव : जळगाव शहरातील मेहरूण येथे राहणाऱ्या तरूणाचा धारदार हत्यार आणि दगडाने वार करून निर्घृण खून केल्याचा धक्कादायक घटना सोमवारी समोर आली.
प्रमोद उर्फ भूषण सुरेश शेट्टी (वय-३३) रा. मेहरूण, जळगाव असे मृत तरूणाचे नाव आहे. भाड्याने घरात राहणाऱ्या विवाहितेसोबत असलेल्या अनैतिक संबंधातून हा खून झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी घरमालक तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. जळगाव पोलीस याप्रकरणी आता अधिक तपास करत असून दोघा जणांना या तरुणाच्या हत्येप्रकरणी अटकही करण्यात आली आहे.

दोन दिवसांपासून प्रमोद नावाचा तरुण बेपत्ता होता. त्याचा मृतदेह निमखेडी शिवारातील गिरणा नदीच्या काठावरील महादेव मंदीराजवळ आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली.

प्रमोद शेट्टी हा नेहमीप्रमाणे ड्युटी आटोपून घरी येण्यासाठी निघाला. पण दोन दिवस उलटूनही तो घरी परतला नाही. याच दरम्यान पोलिसांनी चौकशी केल्यावर त्याचा मृतदेह सोमवारी गिरणा नदीच्या काठावरील महादेव मंदीराजवळ आढळून आला.

एमआयडीसी पोलिसांनी खून करणाऱ्या संशयिताबद्दल माहिती काढली असता आरोपी जंगलात लपून बसल्याचं समोर आलं. दोघेही आरोपी जळगाव तालुक्यातील उमाळा येथील जंगलात लपून बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी खून करणाऱ्या सत्यराज नितीन गायकवाड, वय 26 रा. गणेश नगर, जळगाव, सुनिल लियामतखाँ तडवी, वय 26 , रा. पंचशील नगर, फुकटपुरा, तांबापुरा, जळगाव या दोघांना अटक केली.

पुढील कारवाईसाठी दोघांना जळगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. कट रचून दोघांनी नियोजनबद्ध पद्धतीने हा खून केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. आता नितीन आणि सुनिल या दोघांचीही कसून चौकशी केली जातेय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here