पाणीपुरवठा करणाऱ्या नळांमधून चक्क सापाची पिल्ले आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

पोलादपूर : रायगडमधील पोलादपूर नगरपंचायतीचा बेजबाबदारपणा उघड करणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नगरपंचायतीकडून शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.

पोलादपूर शहरातील आनंदनगर येथे राहणाऱ्या रहिवाशांना पाणीपुरवठा करणाऱ्या नळांमधून चक्क सापाची पिल्ले आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे.

नेहमीप्रमाणे महिला पाणी भरण्यासाठी नळावर गेल्या. पाणी भरण्यासाठी भांडे नळाखाली लावले आणि नळ खोलले. त्यानंतर भांड्यात पाण्यासोबतच सापाची पिल्लेही पडू लागली. साप पाहताच महिला घाबरल्या आणि एकच गोंधळ उडाला.

नागरिकांमध्ये तीव्र संताप

या अक्षम्य कारभारामुळे परिसरात रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. विषारी साप या पाण्यातून येत असल्याने पुढे हे प्रकरण नागरिकांच्या जीवावर बेतले तर त्याला जबाबदार कोण ? हा सवाल पोलादपूरचे नागरिक करीत आहेत.

या सापाच्या पिल्लांनी कोणाला चावा घेतला आणि कोणी मृत्यूमुखी पडलं तर याला जबाबदार कोण ? अशा प्रश्न सध्या निर्माण होत आहे. त्यामुळे पोलादपूर नगरपंचायतीने याकडे लक्ष देऊन त्वरित यावर कारवाई करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

गावकऱ्यांकडून तीव्र आंदोलनाचा इशारा

हे प्रकरण समोर येताच संतप्त नागरिकांनी नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांना चांगले धारेवर धरले. पाइपलाइनचे काम तात्काळ करा अथवा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here