दसऱ्याला आईने पुरणपोळ्या केल्या नाहीत,आई म्हणत आहे. बँकेचे अनुदान आले की दिवाळीला पुरणपोळी करु

दिवाळी तरी गोड करा, शेतकऱ्याच्या सहावीतील मुलाचं मुख्यमंत्र्यांना पत्र

शेतकऱ्याची (Farmer) सध्याची परिस्थिती आणि व्यथा सांगणारं एका चिमुकल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना लिहिलेलं पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हिंगोलीतील (Hingoli) शाळेत शिकणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलाने हे पत्र लिहिलं आहे. पिकाच्या नुकसानीची भरपाई दिवाळी आधी मिळावी, अशी मागणी या चिमुकल्याने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

कधी अतिवृष्टी तर कधी अवकाळी पाऊस यामुळे राज्यातील शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. परंतु शेतातील नुकसानीचा परिणाम शेतकऱ्यांच्या मुलांच्या वैयक्तिक आयुष्यावर होत आहे. तर सण, उत्सव सुद्धा आर्थिक अडचणीमुळे साजरे करता येत नाहीत. या वर्षी सुद्धा शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानीची भरपाई दिवाळी आगोदर मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना एका चिमुकल्याने पत्र लिहित केली आहे.

हिंगोलीतील गोरेगाव येथील सहावी इयत्तेत शिकणारा विद्यार्थी प्रताप कावरखे याने हे पत्र लिहिलं आहे. या वर्षी शेतातील सोयाबीन पिकाचे पूर्ण नुकसान झालं आहे. त्यामुळे खर्चाला सुद्धा पैसे मिळत नाहीत. दसऱ्याला आईने पुरणपोळ्या केल्या नाहीत. इथे विष खायला पैसे नाहीत तर पुरणपोळी कुठे करणार असं आई म्हणत आहे. बँकेचे अनुदान आले की दिवाळीला पुरणपोळी करु, असं आई म्हणते. गावाजवळील एका गावात शेतकऱ्याच्या मुलाने वडिलांना खाऊसाठी पैसे मागितले तर त्याच्या वडिलांनी फाशी घेतली. म्हणून मी बाबाकडे पैसे मागत नाही. परंतु मुख्यमंत्री साहेब आमच्या घरी पाहा की, तुम्ही या अनुदानाचे पैसे लवकर द्या मग आई दिवाळीला पोळ्या करते. तुम्ही या पोळ्या खायला, असं या चिमुकल्याने पत्रात लिहिलं आहे.

एकनाथ शिंदे
सायेब, मंत्री, मूंबई
माहे बाबा शेती करतात. आमच्या घरी शेती कमी हाय, असं बाबा म्हनतात. मी बाबाले म्हणल की मले गूपचूप आयले पैसे द्या म्हया संग भांडन करतात. म्हनतात यावर्षी सगळी सोयाबीन गेली, वावर इकतो देतो तूले दहा रुपये. आईन दसऱ्याले पूरणाच्या पोळ्या पण नाही केल्या. आई म्हणे इथ इश खायला पैसे नाहीत. वावरातली सोयाबीन गेली. महे बाबा दुसऱ्याच्या कामाले जातात. मी आईला म्हणत आपल्याले दिवाळीले पोळ्या कर ती म्हणे की बँकेत अनूदान आलं की करु पोळ्या. सायब आमच्या घरी सनाल्या पोळ्या करायले पेसे नाहीत. आम्हाले घर नाही, आम्हाले काहीत नाही. मी बाबा संग भांडन केलं की ती आई म्हणे आपल्या जवळच्या जयपूरच्या गावात शेतकरी त्याच्या पोरान पेसे माघतल्या मनून फासी घेतली आता मी बाबाले पेसे नाहीत मागत. सायेब आमच घर पाहा की तूम्ही या आनूदानचे पेसे लवकर द्या. मग दिवाळीले आई पोळ्या करते. तूम्ही या पोळ्या खायले, सायेब

तुमता आणी बाबाचा लाडका
प्रताप कावरखे, इयत्ता सहावी वर्ग
जी.प. शाला गोरेगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here