शेगाव शहरातील मुरारका जीनसह घराचा अवैधपणे ताबा घेण्यासाठी अकोल्यातील 40 ते 50 जणांनी येऊन गोंधळ घातला. सामानाची नासधूस केली.
यामध्ये शहरातील प्रतिष्ठित नागरिक संजय शेठ मुरारका यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद शहरात आता उमटू लागले आहेत. शहरातील सर्वच राजकीय पक्षांसह व्यापारी आणि शहरातील नागरिकांनी पोलीस ठाण्यावर धडक मुक मोर्चा काढून मुरारका यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या आरोपीतांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. या मागणीसाठी पोलीस ठाण्याच्या आवारात आंदोलन करण्यात आलं.
दरम्यान पोलिसांनी 40 ते 50 लोकांविरोधात गुन्हे दाखल केल्यानंतर हा तणाव निवळला. घटनेच्या निषेधार्थ उद्या शेगाव शहर बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी असोसिएशनच्या वतीने घेण्यात आला आहे. काल शनिवारी दुपारच्या सुमारास महाराजा अग्रसेन चौकातील मुरारका जीनची जागाखाली करून घेऊन त्याचा ताबा घेण्यासाठी अकोल्यावरून 40 ते 50 लोकांचा जमाव आल्याने एकच खळबळ उडाली होती. अचानकपणे एवढा मोठा जमाव दाखल झाला.
त्यावेळेस त्यांच्या निवासस्थानी एकमात्र महिला घरी होती. त्यामुळे मुरारका कुटुंबीयांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच मुरारका यांच्याशी संबंधित मित्रमंडळींनी घटनास्थळी धाव घेतली. या अनपेक्षित प्रकारामुळे अग्रसेन चौकात बराचवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते
घटनेबाबत सविता संजय मुरारका यांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी मुरारका यांच्या घराजवळ पोलिसांची व्हॅन उभी करून गस्त लावल्याचे दिसून आले. मात्र या वादावादीनंतर संजयसेठ मुरारका यांना हृदयविकाराचा झटका आला. यामध्ये त्यांना प्रथम शेगावात आणि नंतर अकोल्यात हलविले होते. मात्र आज पहाटे त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच समाजबांधवांसह शहरातील सर्वच राजकीय पक्ष आणि व्यापाऱ्यांनीही पोलीस ठाण्यावर मूक मोर्चा काढला. यानंतर पोलीस ठाण्यात पोहचल्यानंतर गुन्हे दाखल करण्याची मागणी करीत नागरिकांनी तिथेच ठिय्या दिला. जोपर्यंत आरोपींविरोधात गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत उठणार नाही आणि सायंकाळी मुरारका यांचा मृतदेह ठाण्यात आणून ठेवला जाईल, असा इशारा देण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात मृतक संजय मुरारका यांच्या पत्नी सविता मुरारका यांच्या तक्रारवरून शैलेश सुधाकर खरोटे, सचिन सुहास कोकाटे, दिपक रामचंद्र मसने आणि सचिन विजय पोसपुरवार यांच्यासह 40 ते 50 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ उद्या सोमवारी शेगाव शहर बंद करणार असल्याची घोषणा व्यापारी असोशिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.