पत्नीनं आपल्या पतीच्या प्रेयसीला संपवलं

परस्त्रीशी असलेल्या संबंध एका व्यक्तीला चांगलेच महागात पडलेत. पतीचे परस्त्रीशी संबंध असल्याच्या रागातून पत्नीनं आपल्या पतीच्या प्रेयसीला संपवलं.गुन्ह्यात त्या महिलेच्या दोन मैत्रिणींनी साथ दिल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास करून तिन्ही महिला आरोपींना अटक केली आहे. ईशा मिस्त्री अशी मृत प्रेयसीचं नावं आहे.

कुर्ला येथील बंटर भवन समोरील नाल्यात एका गोणीत एक महिलेचा मृतदेह आढळून आला होता. स्थानिकांनी याची माहिती नेहरू नगर पोलीस ठाण्यात दिली होती. यानंतर पोलिसांनी कुजलेला मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनसाठी राजावाडी शवविच्छेदन केंद्रात पाठवला. शवविच्छेदनामध्ये या महिलेचा गळा आवळून खून करून मृतदेह गोणीत भरून गोणी नाल्यात टाकून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले.

याबाबत नेहरूनगर पोलीस ठाण्यामध्ये हत्येचा गुन्हा नोंद झाल्यानंतर घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यात असता दोन महिलांनी रिक्षातून ही गोणी आणल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी रिक्षा चालकाचा शोध लावला. रिक्षाचालकाने सदर महिला या ठक्कर बाप्पा कॉलनीमधून रिक्षा करून माहुल गाव इथे गेल्या होत्या आणि माहुल गाव येथून एक गोणी घेऊन पुन्हा त्याच्या रिक्षातून कुर्ल्यात आल्याची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी या माहितीवरून पुन्हा सीसीटीव्ही तपासले आणि यातील महिला या ठक्कर बाप्पा कॉलनी येथील मीनल पवार आणि तिची बहीण शिल्पा पवार या असल्याचे समोर आले. त्यांना ताब्यात घेताच आठ महिन्याची गर्भवती असलेल्या मीनलने पोलिसांना हत्येची माहिती दिली. मीनलचे पतीचे योगेशचे मयत ईशा मिस्त्री या 16 वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध होते. योगेशने मीनलची मैत्रीण डॉलीच्या घरी ईशाला नेवून ठेवले होते.

डॉलीने याची माहिती मीनलला दिली. मीनलने 30 तारखेला रात्री तिच्या बहिणीसह रिक्षाने माहुल गाव येथे डॉलीचे घर गाठले. डॉलीला तिच्या इमारतीच्या छतावर ईशाला आणायला सांगितले. ती छतावर येताच मीनलने तिची बहीण शिल्पा आणि डॉलीच्या मदतीने तिचा गळा दाबला आणि तिची हत्या केली. हा मृतदेह त्यांनी गोणीत भरून त्याच रिक्षातून आणून तिने कुर्ला येथील बंटर भवन येथील नाल्यात आणून हा मृतदेह टाकला होता. मात्र पोलिसांनी या प्रकरणी चोवीस तासात तपास करून तिन्ही महिला आरोपींना अटक केली आहे. या घटनेतील तिन्ही महिला आरोपीना न्यायालयाने 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here