‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’ची घोषणाबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार

पुणे : पुण्यामध्ये ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’ची घोषणाबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी सायंकाळी पुण्यातील मुस्लीम समुदायामधील काही व्यक्तींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाविरोधात (पीएफआय) राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केलेल्या कारवाईविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान ही घोषणाबाजी करण्यात आली.
पीएफआयविरोधात करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचं नियोजन या आंदोलकांनी केलं होतं. मात्र हे आंदोलन सुरु होण्याच्या आधीच पुणे पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं. त्यामुळे हे आंदोलन रद्द करण्यात आलं. यावेळी अनेकांना पोलिसांच्या गाडीमध्ये बसवलं.

यानंतर आंदोलनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमा झालेल्या आंदोलकांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’च्या घोषणा दिल्या. या घोषणाबाजीचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. यावेळेस आंदोलकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात ‘आरएसएस मुर्दाबाद’ अशीही घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीनंतर पोलिसांनी अन्य काही व्यक्तींनाही ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
या घोषणाबाजी प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी रियाज सय्यद आणि ६० ते ७० पीएफआय कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बेकायदेशीरपणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोळा झाल्याचा उल्लेख यामध्ये पोलिसांनी केला आहे.

दोन दिवसांपूर्वीच पीएफआयचे पुणे जिल्हाध्यक्ष मोहम्मद खैस शेख यांनी दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपावर टीका केली होती. “आरएसएस आणि भाजपाच्या आदेशानेच एनआयएने आमच्यावर कारवाई केली आहे. आमचा विनाकारण छळ सुरू आहे. आमच्या नेत्यांना चार-पाच वर्षे तुरुंगात टाकून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करीत आहेत. आम्हाला या देशाचे नागरिक म्हणून सन्मानाची वागणूक मिळत नाही,” अशी टीका शेख यांनी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here