जबरीने मुलीवर अत्याचार जीवे मारण्याची धमकी

पोलिसांनी गुन्हा दाखल करताच शनिवारी तपासचक्रे फिरविली. चौघांपैकी एक आरोपी अरुण विजय पवार (२०) याला नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील लांजी येथून अटक केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी यशवंत इंदल आडे, अजय इंदल आडे आणि एक विधीसंघर्षग्रस्त बालक अद्याप फरार आहे.

यवतमाळ : महागाव तालुक्यातील हिवरा संगम गावात एका युवकाने ११ वर्षीय मुलीवर अत्याचार केला. आरोपी युवकाला इतर तिघांनी सहकार्य केले. या प्रकरणी चौघांविरुद्ध महागाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
महागाव तालुक्यातील हिवरा संगम परिसरातील एका गावात सहा दिवसांपूर्वी ही घटना घडली.

आरोपी युवक यशवंत इंदल आडे (२२) याने मुलीला काही कामानिमित्त आपल्या घरी बोलावले. त्यावेळी यशवंतसोबत अजय इंदल आडे (१८), अरुण विजय पवार (२०) आणि एक १५ वर्षीय विधीसंघर्षग्रस्त पाहुणा उपस्थित होता. यशवंतने चिमुरडीचा हात धरून तिला घरात ओढत नेले. इतर तिघांनी बाहेरून दरवाजा लावला. घरात यशवंतने जबरीने मुलीवर अत्याचार केला. ही गोष्ट कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

दरम्यान घाबरलेल्या चिमुकलीने घरी कुणालाच काही सांगितले नाही. मात्र अचानक तिची प्रकृती बिघडली. त्यामुळे पालकांनी तिला प्रथम हिवरा येथे व नंतर पुसदच्या डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांना वेगळीच शंका आली. त्यामुळे त्यांनी चिमुरडीच्या पालकांना विश्वासात घेवून तिच्या तब्येतीविषयी विचारण्याचा सल्ला दिला. त्यानंतर चिमुरडीसह पालक घरी परतले.

गेल्या चार-पाच दिवसांपासून ती काहीही खात नसल्याने पालकांनी तिला मांत्रिकाकडेसुद्धा नेले. मात्र चिमुरडी सतत घाबरलेल्या अवस्थेत होती. अखेरीस शुक्रवारी तिने आईला रडतच आपबिती कथन केली. त्यावेळी तिच्या आई-वडिलांना धक्का बसला. त्यांनी तातडीने महागाव पोलीस ठाणे गाठले. तेथे चौघांविरुद्ध तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी चौघांविरुद्ध भादंवि ३७६, १०९, बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ४/६ व ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here