चोवीस तासातच मुलीचा शोध नवनीत राणा यांच्याविरुध्द अदखलपात्र गुन्‍ह्याची नोंद

अमरावती : शहरातील राजापेठ पोलीस ठाण्याअंतर्गत एका 19 वर्षीय युवतीचे अपहरण करून हे प्रकरण लव्ह जिहादचा असल्याचा दावा अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि भाजप खासदार अनिल बोंडे भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केला होता.मात्र, ही तरुणी सातारा येथे सापडली होती. यानंतर नवनीत राणा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्‍या सहा दिवसांपूर्वी राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील एक तरुणी बेपत्ता झाली होती. या तरुणीला शहरातीलच एका तरुणाने पळवून नेले, असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता. या प्रकारामुळे आमची बदनामी झाली आहे, तसेच माझ्या मुलाला धमकी दिल्यामुळे तो भयभीत झाला आहे, अशी तक्रार त्या मुलाच्या वडिलांनी राजापेठ पोलिसांत दिली आहे.
या तक्रारीवरुन राजापेठ पोलिसांनी खासदार राणा यांच्याविरुध्द अदखलपात्र गुन्ह्याची (एनसी) नोंद केली आहे.

रुक्मिनीनगर भागातील तरुणी गेल्‍या ५ सप्टेंबरला दुपारपासून घरुन बेपत्ता झाली होती. दरम्यान या प्रकरणात भाजप पदाधिकारी आणि खासदार नवनित राणा यांनी ६ सप्टेंबरला दुपारी बारा वाजताच्या सुमारास राजापेठ पोलीस ठाणे गाठले. बेपत्ता असलेल्या तरुणीला शहरातीलच एका दुसऱ्या धर्माच्या मुलाने पळवून नेले आहे, त्याला सर्व माहीत आहे, मात्र तो पोलिसांना माहीती देत नाही, पोलिस त्याच्याकडून मुलीची माहिती काढण्यासाठी अपयशी ठरत असल्याचा आरोप करुन खासदार राणा यांनी पोलिसांवर चांगले तोंडसुख घेतले होते. तसेच राजापेठ ठाणेदार मनीष ठाकरे यांनी आपले संभाषण धनिमुद्रित केले, असा आरोपसुध्दा यावेळी खासदार राणा यांनी केला होता. या प्रकारावरुन राजापेठ ठाण्यात वातावरण चांगलेच तापले होते. पोलीस व खासदार राणा आमनेसामने आले होते.

दरम्यान, नंतर चोवीस तासातच मुलीचा शोध लागला, ती साताऱ्यात सापडली आणि एकटी होती. आपल्याला कोणीही पळवून नेले नाही. मला एका अभ्‍यासक्रमाला प्रवेश घ्‍यायचा असल्यामुळे मी स्वत: आले होते, असे तरुणीने पोलिसांना सांगितले. दरम्यान खासदार राणा यांनी मुलासोबतच आमची बदनामी केली, तसेच माझ्या मुलाला पाहून घेवू, अशी धमकी दिली आहे. या प्रकारामुळे तो भयभीत झाला आहे. अशी तक्रार प्राप्त झाल्यामुळे राजापेठ पोलिसांनी धमकी देणे, बदनामी करणे अशा कलमान्वये खासदार नवनीत राणा यांच्याविरुध्द अदखलपात्र गुन्‍ह्याची नोंद केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here