मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा मंत्रिमंडळात समावेश?

राज्यातील सत्ता पालटल्यानंतर भाजपाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संपर्क साधला असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याची ऑफर दिली आहे.

अमित ठाकरे सध्या आमदार किंवा विधान परिषद सदस्य नाहीत. असे असतानाही त्यांना मंत्री करण्याचा निर्णय हा शिवसेनेतील ठाकरे कुटुंबाचा प्रभाव कमी करण्याचा आणखी एक प्रयत्न असू शकतो. भाजपाने नुकतेच शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी नेमणूक करुन स्वतःकडे उपमुख्यमंत्री ठेवले आहे.

इकॉनॉमिक्स टाईम्सच्या वृत्तानुसार, शिवसेनेला धक्का देण्यासाठी भाजपाची ही नवी खेळी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मोठा फटका शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे शिवसेनेची सूत्रे हाती घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. अशा परिस्थितीत अमित ठाकरेंना मंत्रिमंडळात आणण्याच्या हालचाली या आदित्य ठाकरे यांच्यासाठी थेट आव्हान म्हणून पाहिले जात आहे. तरुणांना आकर्षित करण्यासाठी अमित आणि आदित्य ठाकरेंना युवा नेतृत्व म्हणून समोर आणले जात आहे.

दरम्यान, मनसे नेत्यांचा दावा आहे की, त्यांना अशा कोणत्याही प्रस्तावाची माहिती नव्हती. भाजपा नेत्यांनीही याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, राज ठाकरेंनी ही ऑफर धुडकावून लावल्याचे वृत्त मनसेकडून येत आहे. मात्र याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here