महिलेला चावला साप पतीने सापासह गाठलं हॉस्पिटल

एका महिलेला घरात असताना तिला साप चावला. सापाला पाहून महिलेने आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर घरात उपस्थित असलेले पती आणि इतर कुटुंबीय तिच्या मदतीसाठी धावले. पतीने त्या सापाला पकडून बाटलीत बंद केलं.सापाला बाटलीत टाकल्यानंतर त्याला श्वास घेण्यासाठी कोणती अडचणी होऊ नये याची सुद्धा त्याने काळजी घेतली. त्यासाठी त्याने बाटलीला छिद्र पाडले होते. या सापाला बाटलीत घेऊन त्याने हॉस्पिटल गाठलं. हे ऐकून तुम्हाला सुरूवातीला आश्चर्य वाटेल. पण हे खरंय.

उत्तर प्रदेशमधल्या उन्नावमध्ये ही घटना घडली आहे. उन्नावमधील माखी पोलीस स्टेशन हद्दीतील राऊ अफजल नगर येथील रहिवासी असलेल्या रमेंद्र यादव यांची पत्नी गुरुवारी रात्री उशिरा घरी काम करत होती, त्यावेळी घरात सापाने दंश केला. सापाला पाहून ती ओरडू लागली. आवाज ऐकून सर्वजण धावत आले, तेव्हा पती रामेंद्रने सापाला पकडून बाटलीत बंद केले. तरुणाने एका कोल्ड्रिंकच्या बाटलीत सापाला टाकून झाकण घट्ट केले. यानंतर तो पत्नी आणि सापाला घेऊन जिल्हा रुग्णालयात पोहोचला.

यावेळी डॉक्टरांनी विचारले की, तुम्ही साप का आणला? रामेंद्र म्हणाला की, जेव्हा जेव्हा साप चावतो तेव्हा डॉक्टर विचारतात की कोणता साप चावला आहे, जर डॉक्टरांनी त्याला विचारलं की कोणता साप चावला त्यावेळी डॉक्टरांना दाखवता यावं यासाठी त्याने हा साप बाटलीत बंद करून आणला होता. पण बाटलीत टाकल्यानंतर सापाला श्वास घ्यायला त्रास होऊ नये याची काळजी सुद्धा या तरूणाने घेतली. बाटलीला छिद्र पाडून त्याला सापाला श्वास घेता यावा याची सोय केली होती. महिलेचा पती रामेंद्र याने सांगितले की, हॉस्पिटलवरून परतताना त्याने सापाला जंगलात सोडले आहे. त्याचबरोबर महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here