अग्निपथ विरोधात हिंसक आंदोलन ,700 कोटींहून अधिक रेल्वे मालमत्तेचा धुरळा

केंद्र सरकारने अलीकडेच सैन्यात भरतीसाठी अग्निपथ योजना सुरू केली आहे. या योजनेचा देशभरात विरोध होत आहे. तरूणांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे.
आंदोलनावेळी संतप्त तरूणांनी अनेक रेल्वे गाड्या जाळल्या (train set on fire). यामुळे रेल्वेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. रेल्वेची एक बोगी (bogie) बनवण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च होतो. एका बोगीची किंमत किती आहे हे जाणून घेऊया.

स्लीपर कोचसाठी कोटींमध्ये खर्च

LHB तंत्रज्ञानाने बनवलेल्या एका रिकाम्या कोचची (कोणतीही सीट किंवा सामान नसलेली) किंमत सध्या सुमारे 40 लाख रुपये आहे. यानंतर सीट, पंखे, टॉयलेट आदी उपकरणे बसवण्यासाठी 50 ते 70 लाख रुपयांचा वेगळा खर्च केला जातो. ही किंमत त्या बोगीच्या वर्गावर (जनरल किंवा स्लीपर) अवलंबून असते. अशाप्रकारे एका सामान्य कोचची किंमत 80 ते 90 लाख रुपयांपर्यंत जाते. तर स्लीपर कोच बनवण्यासाठी 1.25 कोटी रुपयांपर्यंत खर्च येतो.

एसी कोचची इतकी किंमत

रिकाम्या डब्याचे एसी कोचमध्ये रूपांतर झाल्यावर एसीची संपूर्ण व्यवस्था, आसनांची गुणवत्ता, पडदे, काचेच्या खिडक्या यावरही मोठी रक्कम खर्च केली जाते. अशा प्रकारे थर्ड एसी आणि सेकंड एसी कोचची किंमत 2 ते 2.5 कोटी रुपयांपर्यंत जाते. तर फर्स्ट एसी किंवा एक्झिक्युटिव्ह एसी कोचची किंमत 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते. त्याचबरोबर इंजिन बनवण्यासाठीही सरकारला २० कोटी रुपये खर्च करावे लागतात. ही किंमत डिझेल इंजिन आणि इलेक्ट्रिकल इंजिननुसार बदलते.

70 कोटी खर्च

भारतातील पॅसेंजर ट्रेनमध्ये साधारणपणे २४ बोगी असतात. ट्रेनला जनरल, स्लीपर, फर्स्ट एसी कोच, एक्झिक्युटिव्ह एसी कोच, थर्ड एसी कोच, सेकंड एसी कोच आदी सर्व प्रकारचे डबे जोडलेले असतात. यासोबतच पॅन्ट्री कोच, लगेज कोच, गार्ड कोच आणि जनरेटर कोच यांचाही यामध्ये समावेश आहे. अनेक कोच बनवण्यासाठी लाखोंचा तर काही कोचसाठी कोटींचा खर्च होतो. अशा प्रकारे एका ट्रेनची किंमत सुमारे 70 कोटी रुपयांवर जाते.

700 कोटींहून अधिक नुकसान

अग्निपथ योजनेच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनांना अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे 12 गाड्यांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. आतापर्यंत 60 बोगी आणि 11 इंजिने पेटवण्यात आली आहेत. या आंदोलनात आतापर्यंत 700 कोटींहून अधिक रुपयांच्या रेल्वे मालमत्तेचे नुकसान झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here