जेवण करताना झालेल्या वादातून भरझोपेत डोक्यात दगड घालून खून

बीड: जेवण करताना झालेल्या वादात एका मित्राने दुसऱ्याला बुक्की मारली. त्यानंतर सूड भावनेने पेटलेल्या तरुणाने भरझोपेत डोक्यात दगड घालून खून केला.ढकणमोहा येथे २६ मार्च रोजी पहाटे हा थरार घडला. मयत व आरोपी पश्चिम बंगालचे आहेत.

हैदरअली तरफदार अब्दुल हसन तरफदार (४८, रा. कालापूर जि. नदीया ,पश्चिम बंगाल) असे मयताचे नाव आहे. सीमोल बिश्वास विपेंद्रनाथ बिश्वास (३०, रा. नारायणपूर जि. नदीया,पश्चिम बंगाल) असे आरोपीचे नाव आहे. ढेकणमोहा येथे नगर- बीड- परळी रेल्वेमार्गाच्या पुलाचे काम सुरू आहे. त्यासाठी पश्चिम बंगाल येथील मजूर ढेकणमोहा येथे पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. दरम्यान, २५ रोजी रात्री साडेनऊ वाजता हैदरअली व तरफदार व सीमोल बिश्वास हे दोघे जेवणासाठी बसले होते. यावेळी त्यांनी मद्यपान देखील केले.

दरम्यान, यावेळी त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर हैदरअली तरफदार याने सीमोलच्या नाकावर बुक्की मारली. यात त्याच्या नाकातून रक्त निघू लागले. तो दवाखान्यात जाण्यासाठी गावात आला. यानंतर पुन्हा कामाच्या ठिकाणी पोहोचला. तोपर्यंत हैदरअली झोपी गेला होता. सीमोल बिश्वास याने दगड डोक्यात घालून त्याचा खून केला.पहाटे ही घटना उघडकीस आली. पिंपळनेर ठाण्याचे सहायक निरीक्षक बाळासाहेब आघाव, उपनिरीक्षक बाबासाहेब खरात, सहायक उपनिरीक्षक आत्माराम गर्जे, हवालदार बी. टी. खरमाटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी सीमोल बिश्वास यास ताब्यात घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here