पुणे मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन,विजेवर धावणाऱ्या (ई-बस) १४० गाडय़ांचे आणि ई-बस आगाराचे लोकार्पण, व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण आर्ट गॅलरीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

पुणे : याआधी प्रकल्पांचे भूमिपूजन व्हायचे, पण उद्घाटन केव्हा होणार, हे अनिश्चित असायच़े आता मात्र प्रकल्प वेळेत पूर्ण होत आहेत, हा संदेश पुणे मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनामुळे जनतेत पोहोचला आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काँग्रेस राजवटीवर नाव न घेता टीका केली.प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत, यासाठी पीएम गती-शक्ती राष्ट्रीय बृहत् आराखडा केंद्र सरकारने तयार केल्याचेही त्यांनी सांगितले.

”पायाभूत सुविधांच्या विकासासाठी गती आवश्यक आहे. गेल्या काही दशकांत देशात योजना जाहीर झाल्या़ मात्र त्या पूर्ण होण्यास मोठा कालावधी लागला. ही संथगती विकासाला मारक ठरली. दोन शासकीय विभागांतील समन्वयाचा अभाव यापूर्वी दिसून येत होता. आता गती आणि प्रकल्प पूर्ण करण्याच्या कालावधीकडे लक्ष दिले जात आहे. त्यासाठी पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहत् आराखडा उपयुक्त ठरला, असे मोदी यांनी सांगितले.

पुणे महापालिकेच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळय़ाचे अनावरण, मुळा-मुठा नदी सुधार आणि मुळा-मुठा नदीकाठ पुनरुज्जीवन प्रकल्पाचे उद्घाटन तसेच विजेवर धावणाऱ्या (ई-बस) १४० गाडय़ांचे आणि ई-बस आगाराचे लोकार्पण, व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण आर्ट गॅलरीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी झाले. गरवारे महाविद्यालय स्थानकापासून आनंदनगर मेट्रो स्थानकापर्यंत मोदी यांनी मेट्रोतून प्रवास केला. त्यानंतर कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयाच्या प्रांगणात जाहीर कार्यक्रम झाला. त्या वेळी ते बोलत होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकासमंत्री एकनाथ िशदे, विधानसभेतील विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस, महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरीच्या महापौर माई ढोरे या वेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here