आरोग्य भरतीतील घोटाळ्यात सहभागी राज्यातील एजंट्सचे धाबे दणाणले

राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या आरोग्य भरतीच्या पेपरफुटी प्रकरणी पुणे सायबर पोलीसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. गोपीचंद सानप आणि नितीन जेऊरकर अशी या दोघांची नावे आहेत. गोपीचंद सानप हा वर्धा जिल्ह्य़ात आरोग्य सेवक म्हणून काम करतो. तो मुळचा बीड जिल्ह्य़ातील आहे. तर अटक करण्यात आलेला दुसरा आरोपी सुधाकर जेऊरकर हा अमरावतीचा असून त्याने पेपर फोडण्यासाडी मुख्य आरोपींना मदत केल्याचं पोलीसांनी सांगितले. पेपरफुटीत सहभागी असल्याबाबत मुख्य आरोपींना अटक केल्यानंतर पुणे सायबर पोलीसांनी आता एजंट्सकडे लक्ष केंद्रित केल्याने आरोग्य भरतीतील घोटाळ्यात सहभागी राज्यातील एजंट्सचे धाबे दणाणले आहेत. पोलीस चौकशीत या दोघांकडून आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. बीड आणि अमरावती जिल्ह्यातून अटक करण्यात आलेल्या सुधाकर आणि गोपीचंद यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

एजंटचे दणाणले धाबे –
पुणे पोलीसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून पेपरफुटी प्रकरणाचा तपास वेगाने केला जात आहे. मुख्य आरोपींना अटक केल्यानंतर पोलीसांनी आता एजंट्सकडे लक्ष केंद्रित केले आहे. मुख्य आरोपी निशीद गायकवाड एजंट आणि काही इतर शासकीय नोकरदारांना याप्रकरणी अटक केलेली आहे. पुणे सायबर पोलीसांनी जवपळपास याप्रकरणात 18 जणांना अटक केलेली आहे. म्हाडा, टीईटी आणि आरोग्य भरती या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून वेगाने सुरू आहे.

पेपरफुटीसाठी न्यासाही जबाबदार –
आरोग्य भरती पेपरफुटीसाठी न्यासा जबाबदार असल्याचे पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी 28 डिसेंबर रोजी सांगितले होते. या पेपरफुटी प्रकरणात सामिल असलेल्या न्यासाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले होते. 24 ऑक्टोबर रोजी झालेला आरोग्य विभागाचा गट क चा पेपरही फुटला होता. यामध्ये न्यासा कंपनीचे अधिकारी सहभागी होते. गट ‘ड’ चा पेपर न्यासाचे अधिकारी आणि बोटले आणि बडगिरे अशा दोन व्यक्तींच्या माध्यमातून फुटला. दोघे एकमेकांशी संबंधित होते का याचा तपास सुरू आहे.

असा फोडला परीक्षेचा पेपर –
एका पेपरसाठी हे दलाल पाच ते आठ लाख रुपये घेत असल्याची माहिती समोर आली आहे. न्यासा कंपनीचे वरिष्ठ अधिकारी देखील यात सहभागी आहेत. त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. न्यासाच्या अधिकाऱ्यांनी प्रश्नपत्रिका प्रिंट करताना पेपर फोडला असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here