चार जीवाभावाच्या मित्रांवर एकाच वेळी अपघात

संकेश्वर : येथील राष्ट्रीय महामार्गाजवळ बायपास रोडवर वेगवान दुचाकी पलटी झाली. या भीषण अपघातात संकेश्वर येथील अनंतविद्या नगरातील तीन मित्रांचा जागीच मृत्यू झाला.गुरुवारी (ता. २४) रात्री उशिरा ही घटना घडली. बसवराज अर्जुन माळी (वय 26), प्रवीण कल्लापा सनदी (वय 29) व मेहबूब सय्यद शेगडी (वय 21) अशी मयत युवकांची तर मलिक फरहान जमादार (वय 21, रा. कंजर गल्ली, बेळगाव) असे जखमीचे नाव असून त्याची प्रकृती गंभीर होती. मात्र त्याचाही उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, बसवराज माळी, प्रवीण सनदी, मेहबूब सय्यद शेगडी व मलिक जमादार हे दुचाकी (केए २३ एएस ७२५६) घेऊन गेले होते. निपाणीकडून शहरातील पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या बायपास रोडवर पर्वतराव पेट्रोल पंपाजवळ गुरुवारी (ता. २४) रात्री बाराच्या सुमारास पोहोचले. यावेळी त्यांची दुचाकी पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की त्यात बसवराज माळी, प्रवीण सनदी, मेहबूब सय्यद शेगडी हे जागीच ठार झाले.

अपघाताची माहिती मिळताच संकेश्वरचे पोलिस निरीक्षक प्रल्हाद चन्नागिरी व पोलिस उपनिरीक्षक गणपती कोगेनहळ्ळी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र या घटनेत ठार झालेल्यांची नावे लवकर समजू शकली नाहीत. अपघातात मृत्यूमुखी पडलेले तीन मित्र हे संकेश्वर येथील अनंत विद्यानगर येथील रहिवासी असल्याची माहिती अधिक चौकशीनंतर मिळाली. अपघाताबाबत संकेश्वर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

चार मित्रांच्या जाण्याने हळहळ

संकेश्वर येथील चार जीवाभावाच्या मित्रांवर एकाच वेळी अपघाताच्या रूपाने काळाने घाला घातला. या घटनेमुळे संकेश्वर शहरासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. येथून राष्ट्रीय महामार्ग गेल्याने अनेकदा अपघात होतात. पण या अपघातात एकाच वेळी तीन मित्र गेल्याने त्याची चर्चा सुरू आहे.



LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here