बंगळुरू बाजार समितीत कांद्याला सोलापूरपेक्षा चांगला भाव

सोलापूर : बाजार समितीत कांद्याची उलाढाल वाढली, विक्रमी आवक होत कांद्याला चांगला दरही मिळू लागला, मात्र हा दर केवळ एक नंबर दर्जाच्या कांद्यालाच मिळत आहे. दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या प्रतवारीचा कांदा अत्यंत कमी दराने विकू लागल्याने दोन व तीन नंबर प्रतीच्या कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांना बंगळुरूचा रस्ता धरावा लागत आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही कांदा खरेदी- विक्रीत लासलगाव, चाकणच्या बरोबरीने नावरुपाला आली आहे. संक्रांतीच्या सुटीच्या काळात ९५५ ते एक हजार ट्रकांची विक्रमी आवक होण्याचा बहुमान सोलापूर बाजार समितीने मिळवला आहे. जिल्ह्यासह इंदापूरसह मराठवाड्यातील बीड, उस्मानाबादमधील शेतकऱ्यांचीदेखील सोलापूरच्या बाजार समितीला पसंती मिळू लागली आहे. कांदा विक्री उलाढालीचे उच्चांक नोंदवत असतानाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सोलापूर बाजार समितीतून उत्कृष्ट गुणवत्तेच्या कांद्यासाठी चांगला दर मिळतो. मात्र, ग्रेडिंगनुसार दोन व तीन नंबर प्रतीच्या कांद्याला मात्र बंगळुरूच्या तुलनेत कमी दर मिळत आहे. यामुळे दुसऱ्या व तिसऱ्या प्रतिचा कांद्याची विक्री करण्यासासाठी शेतकऱ्यांकडून बंगळुरू बाजारला पसंती दिली जात आहे.

कांद्याचा लेखाजोखा

सोलापूर बाजार समितीमध्ये सध्या क्रमांक एकच्या कांद्यासाठी प्रतिक्‍विंटल ३२०० ते ३३०० रुपये दर मिळत आहे. दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाचा दर यापेक्षा कमी आहे. जानेवारी महिन्यात कांद्याची विक्रमी आवक झाली होती. सध्या नियमित ३५५ ते ३७० ट्रक कांद्याची आवक सोलापूर बाजार समितीत होत आहे. तज्ज्ञांच्या अंदाजनुसार हॉटेल उद्योगात मोठ्या कांद्याला मागणी जास्त आहे. तर घरगुती वापरासाठी मध्यम आकारच्या कांद्याला मागणी आहे. प्रक्रिया करण्यासाठी स्वस्त असेल तो माल उचलला जातो.

एक नंबर गुणवत्तेचा माल कमीच

शेतकऱ्यांच्या एकूण उत्पादनात मोजकाच कांदा एक नंबर गुणवत्तेचा असतो. दोन व तीन नंबर प्रतीचा कांदा अधिक असतो. यामुळे कमी कांद्याला जादा दर मात्र, जास्तीत जास्त प्रमाणात असलेल्या दोन व तीन नंबर प्रतीच्या कांद्याचा कमी दर मिळाल्याने त्याचा थेट परिणाम एकूण उत्त्पन्नावर होत आहे. यामुळे पूर्वी हैदराबाद, बंगळुरूऐवजी सोलापूर मिळालेली पंसती पुन्हा राज्याबाहेर जाण्याचा धोका निर्माण होत आहे.

गुणवत्तेवर दर अवलंबून आहेत. त्याबरोबरच व्यापाऱ्यांची मागणी कशी आहे, त्यावरही दर अवलंबून आहेत. ज्या प्रकारच्या मालाला अधिक मागणी त्याला जादा दर असे गणित आहे. बंगळुरू बाजार समितीत माल पोहोचविण्यासाठी किलोमागे तीन रुपये भाडे भरावे लागते. याचाही विचार करणे आवश्‍यक आहे.

– गजानन होनराव, अडत दुकानदार, सोलापूर बाजार समिती

बंगळुरू बाजार समितीत कांद्याला सोलापूरपेक्षा चांगला भाव आहे. शिवाय पट्टी रोख मिळते. यार्डातून कांदाही चोरीला जात नाही. चुकून तशी घटना घडली तर त्याची पूर्ण जबाबदारी तेथील अडत दुकानदार घेतात. यामुळे आमचा पुन्हा कल बंगळुरूकडे झुकला आहे.

– अंकुश फंड,कांदा उत्पादक, पडसाळी, ता. उत्तर सोलापूर

बंगळुरूमध्ये लहान व मोठा असला तरी कांद्याच्या भावामध्ये खूप फरक पडत नाही. याशिवाय सोलापूरप्रमाणे पट्टी देण्यास दोन-दोन महिने लावत नाहीत. कांदा विक्री होताच लगेच रोख स्वरुपात पट्टी दिली जाते. हा दोन्ही बाजारातील फरक आहे.

– दशरथ माळी,कांदा उत्पादक, पडसाळी, ता. उत्तर सोलापूर

बंगळुरूला किलोमागे तीन रुपये भाडे जरी जास्त गेले तरी सोलापूरकरता एक रुपया तरी जाते. सोलापूरपेक्षा नेहमीच किलोमागे चार ते पाच रुपये जादा दर मिळतो. एका ट्रकमागे दहा हजार रुपये जादा येतात. यात काढणीचा खर्च निघतो.

– सचिन कादे,कांदा उत्पादक, वाळूज (दे.), ता. मोहोळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here