चर्चेत येण्यासाठी कोण काय करेल हे सांगता येत नाही

पाचोड : चर्चेत येण्यासाठी कोण काय करेल हे सांगता येत नाही. रविवारी (ता. २०) एक तरुण ‘दारूची बाटली द्या’ म्हणत शहरातील धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या भारतीय संचार निगम लिमिटेडच्या टॉवरवर चढला होता.
तर, सोमवारीही एक तरुण ‘दारूबंद करा, मी खाली उतरतो’ असे म्हणत टॉवरवर चढला होता. राज्य सरकारने नुकतेच मॉलसह किराणा दुकानात वाइन शॉप ठेवणे व विकण्याची परवानगी देऊ केली आहे. या घटनेचे काय परिणाम होऊ शकतात, याची एक झलक पाचोड (ता.पैठण) येथील एका मद्यपीने दाखवून दिली आहे.

मद्याच्या आहारी गेलेल्या या तरुणाने रविवारी चक्क येथील भारतीय संचार निगमच्या कार्यालयामधील टाॅवरवरती चढून दोन ते तीन तास गोंधळ घालत ‘दारूची बाटली द्या, तेव्हा खाली येतो’ असे म्हणत गोंधळ घातला. हे प्रकरण एवढ्यावर न थांबता दुसऱ्या दिवशी त्याची पुन्हा पुनरावृत्ती घडली. सोमवारी पुन्हा एकाने ‘गावा-गावांतील अवैध दारू बंद करा, तेव्हा मी खाली उतरतो, अन्यथा जीव देतो’ असे म्हणत अवघे पाच-सहा तास मनोऱ्यावर चढून गोंधळ घातला. परिणामी, महामार्गावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. काही वेळाने तो स्वतःच खाली उतरला अन् घटनास्थळावरील गर्दी ओसरली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here