
शिरूर तालुक्यातील रावडेवाडी येथील गेनभाऊ शंकर तांबे यांच्या मेंढ्यांच्या कळपावर हल्ला करून बिबट्याने पाच मेंढ्यांची कोकरे व दोन शेळ्या ठार केल्या आहेत.
शिरूर : शिरूर तालुक्यातील रावडेवाडी येथील गेनभाऊ शंकर तांबे यांच्या मेंढ्यांच्या कळपावर हल्ला करून बिबट्याने पाच मेंढ्यांची कोकरे व दोन शेळ्या ठार केल्या आहेत.
सोमवारी (दि.१४) दुपारी चारच्या दरम्यान गेनभाऊ तांबे हे त्यांचा मेंढ्यांचा कळप घेवून रावडेवाडी येथील त्यांच्या घराजवळील शेतात चाऱ्यासाठी गेले होते. काही मेंढ्या व शेळ्या पाणी पिण्यासाठी जवळच असलेल्या शेतातील पाटावर गेल्या. तेथे जवळच उसाचे क्षेत्र आहे, उसाच्या बाजूने आवाज झाला म्हणून तांबे यांनी घाईघाईने तिकडे धाव घेतली असता त्यांना त्या बाजूला दोन मेंढ्यांची कोकरे उसाच्या जवळ मृत अवस्थेत पडलेल्या दिसल्या. त्यामुळे ते घाबरून गेले त्यांनी बाकी कळपाला गोळा करण्याचा प्रयत्न केला. परंतु सर्व कळपच घाबरून गेल्याने जनावरे सैरावैरा पळत होती. जवळ कुणीच नसल्याने तांबे घाबरून गेले व त्यांनी आपला कळप घराच्या दिशेने नेण्यासाठी प्रयत्न चालू केला, यातच त्यांची धांदल उडाल्याने ते घाबरून गेले होते.
संध्याकाळी अंधार पडल्यानंतर आपली नक्की किती जनावरे बिबट्याच्या हल्ल्यात गेली याविषयी त्यांना अंदाज काढता आला नाही. सकाळी उजाडल्यानंतर त्यांनी उसाच्या कडेकडेने शोध घेतला असता एकूण पाच मेंढ्यांची कोकरे व दोन शेळ्या वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याचे समजले. घाबरून आजूबाजूला दडून बसलेल्या दोन शेळ्या सकाळी त्यांच्या कळपात दाखल झाल्या.
दिवसा झालेल्या या हल्यामुळे रावडेवाडी परिसरात शेतकरी व पशुपालक यांच्यामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले असून, या परिसरात वनविभागाने लवकरात लवकर पिंजरा लावण्याची मागणी रावडेवाडी चे सरपंच भाऊसाहेब किठे यांनी केली आहे.