विहिरीत ढकलून एकाचा खून करणार्‍या तरुणास अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. वाय. गौड यांनी आजीवन सश्रम कावासाची शिक्षा

नाशिक : विहिरीत ढकलून एकाचा खून करणार्‍या तरुणास अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. वाय. गौड यांनी आजीवन सश्रम कावासाची शिक्षा सुनावली. अमोल त्र्यंबक मवाळ (२४, रा.निफाड) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.योगेश शिवाजी मोरे असे शिक्षा झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना २८ मार्च २०१० रोजी घडली.

अमोल त्र्यंबक मवाळ हा २८ मार्च २०१० रोजी सायंकाळी साडेपाच वाजता खुलताबाद येथे कार(एम एच १५ बी एन ८४२८) घेऊन आला. मात्र, तो परत आला नाही. त्याचा मोबाईल बंद आला. २ एप्रिल २०१० रोजी मनमाड पोलिसांना त्याचा मृतदेह नवसारी शिवारातील विहिरीत सापडला. त्याची ओळख पटविण्यात आल्यावर अमोल याचा घातपात करुन त्यास जीवे ठार मारल्याची तक्रार अमोलचा भाऊ अविनाश मवाळ याने मनमाड पोलीस ठाण्यात दाखल केली. तपासात अमोल यास प्रेयसीला भेटण्याच्या निमित्ताने योगेश शिवाजी मोरे व शांताराम भगवान काकळीज यांनी नवसारी शिवारात बोलावले. त्यानंतर तेथेच त्यास विहिरीत ढकलून देत खून केला. दरम्यान, अमोलकडे असलेली अल्टो कार योगेश मोरेकडे मिळून आली. त्यावरुन खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ठोंबळ यांनी पुरावे गोळा करुन मालेगाव सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

या खटल्यात विशेष सरकारी वकिल अ‍ॅड. व्ही. एन. हाडपे यांनी कामकाज पाहिले. न्यायालयाने साक्ष व पुराव्यावरुन आरोपी योगेश शिवाजी मोरे यास दोषी ठरवत आजीवन सश्रम कारावास आणि २ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तर शांताराम भगवान काकळीज याची या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली.

न्याय मिळाल्याचे समाधान माझा मुलगा अमोल याचा मारेकरी शोधून त्यास शिक्षा देण्याइतपत पुरावे संकलित करणारे पोलीस अधिकारी व न्यायालयात बाजू मांडणारे सरकारी वकील यांचा आभारी आहे. ११ वर्षांचा संघर्षमय काळात लढून न्याय मिळाल्याचे आम्हा कुटुंबियांना समाधान आहे.
– त्र्यंबक मवाळ, मृत अमोलचे वडील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here