एका दलित वराला घोडीवर बसण्यापासून रोखण्यात आले आणि वऱ्हाडावर दगडफेक

आपलं संविधान जरी धर्मनिरपेक्ष असलं तरी समाजात आजही मोठ्या प्रमाणात जाती आणि धर्माच्या आधारे भेदभाव केला जातो. याच भेदभावाची एक घटना गुजरातमधून समोर आली आहे. गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यात एका दलित वराला घोडीवर बसण्यापासून रोखण्यात आले आणि वऱ्हाडावर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी गावच्या सरपंचासह २८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दगडफेकीत एक जण जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले.

पोलीस उपअधीक्षक कुशल ओझा यांनी सांगितले की, जिल्ह्यातील पालनपूर तालुक्यातील मोटा गावात सोमवारी ही घटना घडली. वऱ्हाड गावातून जात असताना काही अज्ञात लोकांनी दोन ते तीन दगड फेकले, ज्यात वराचा एक नातेवाईक जखमी झाला. आम्ही एफआयआर नोंदवला आहे आणि प्रकरणाचा तपास एससी/एसटी शाखेच्या पोलीस उपअधीक्षकांकडे सोपवला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असे ते म्हणाले. यासंदर्भात एनडीटीव्हीने वृत्त दिलंय.

दरम्यान, वीरभाई सेखलिया यांच्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवण्यात आला आहे. त्यांचा धाकटा भाऊ अतुल याचे लग्न ७ फेब्रुवारी रोजी जवळच्या गावातील मुलीसोबत निश्चित केले होते. गावचे सरपंच भरतसिंह राजपूत आणि मोटा गावातील इतर काही प्रतिष्ठित लोकांना जेव्हा अतुल सेखलिया लग्नात घोडीवर बसणार असल्याचे समजले तेव्हा त्यांनी वराच्या वडिलांना फोन केला आणि त्याचे परिणाम भोगावे लागतील, असे सांगितले. मात्र, सेखलिया कुटुंबीय आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यामुळे सरपंचांनी रविवारी ग्रामस्थांची बैठक बोलावली, असं पोलिसांनी तक्रारीचा हवाला देऊन सांगितलं.

सेखलिया यांनी आपल्या तक्रारीत आरोप केला आहे की, बैठकीत राजपूत आणि इतर २७ जणांनी वराच्या कुटुंबाला जाहीरपणे सांगितले की, “दलित समुदायाचे लोक लग्नात घोडीवर बसू शकत नाहीत, कारण गेल्या अनेक शतकांपासून ही परंपरा आहे”.

तक्रारीनुसार, सेखलिया कुटुंबीयांनी त्यानंतर पोलिस संरक्षणाची मागणी केली, परंतु सोमवारी ही वऱ्हाड एका दुधाच्या दुकानाजवळ पोहोचली तेव्हा काही आरोपींनी वराच्या कुटुंबीयांनी ‘साफा’ परिधान करण्यास आक्षेप घेतला. काही आरोपींनी जातीवाचक शेरेबाजी करत दगडफेक केली. नंतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने वऱ्हाड तात्काळ वधूच्या गावाकडे रवाना झाले आणि लग्नानंतर सायंकाळी परतले. लग्नाच्या एका दिवसानंतर, SC/ST (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याच्या विविध कलमांतर्गत गढ पोलिस स्टेशनमध्ये बेकायदेशीर सभा (IPC कलम 143), गुन्हेगारी धमकी (506) साठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here