बाळापूर : घरगुती भांडणात बोलण्याचा राग धरत जावयाने आपल्या साठ वर्षीय सासूला पाण्याने भरलेल्या विहिरीत फेकून दिल्याने सासूचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत मयताचा मुलगा ज्ञानेश्वर डाखोरे (२३) रा.
अंधार (सांगवी) ता. पातूर, याने बाळापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.
प्राप्त माहितीनुसार पातूर तालुक्यातील आंधार सांगवी येथील डाखोरे कुटुंबीय वाडेगाव येथील संजय ढोरे यांच्या शेतात रखवालीचे काम करीत होते. मृतक चंद्रकलाबाई डाखोरे हिच्यासह या घटनेतील मारेकऱ्याची पत्नी म्हणजे मृतक महिलेची मुलगी व तिचे मुलं सुद्धा इथेच राहत होती. सोमवार, ता. ७ रोजी आरोपी जावई विलास मारोती इंगळे (रा. दुर्गपुर ता. मेहकर) हा शेतात वाडेगाव येथे आला.
पती-पत्नीत वाद झाला. या भांडणात सासू चंद्रकलाबाई हिने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्याने जावई विलास इंगळे याने रागाच्या भरात सासूला विहिरीत ढकलून दिले. ही घटना सोमवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास घडली. मंगळवारी सकाळी शेतमालक शेतात आले असताना हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी याबाबत बाळापूर पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भाऊराव घुगे, सहा. पोलिस निरीक्षक विनोद घुईकर, पोलिस उपनिरीक्षक गजानन रहाटे व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीतील मृतदेह बाहेर काढण्यात आला. या प्रकरणी बाळापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी घटनास्थळावरून फरार
सोमवारी रात्री ही घटना घडल्या नंतर मारेकरी जावई विलास इंगळे हा घटनास्थळावरून पळून गेला असून, त्याच्या मागावर बाळापूर पोलिसांचे एक पथक रवाना झाले आहे. बुलडाणा जिल्ह्यात पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
”घरगुती वादातून ही खुनाची घटना घडली आहे. घटनेतील मारेकरी जावई व मृतक महिलेची मुलगी या पती-पत्नीत वाद होत असल्याने मृतक सासूने मध्यस्थी केल्याने ही घटना घडली आहे. पोलिस आरोपी जावयाचा शोध घेत आहेत.”
-भाऊराव घुगे, ठाणेदार, पोलिस स्टेशन, बाळापूर