
धुळे : कापूस खरेदी प्रकरणात शेतकरी आणि व्यापारी यांच्यात मध्यस्थी केल्याच्या मोबदल्यात चार हजाराची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस नाईक यास धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.या संदर्भात नरडाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिंदखेडा तालुक्यातील बेटावद परिसरात एक व्यापारी कापूस खरेदीचा व्यवसाय गेल्या पंधरा वर्षांपासून करत आहेत. या व्यापाऱ्याने या भागातील एका शेतकऱ्याच्या शेतातील कापूस खरेदी केला. मात्र पैशाच्या कारणावरून नरडाना पोलीस ठाण्यात संबंधित शेतकऱ्यांनी तक्रार अर्ज दिला होता. या तक्रारींमध्ये नरडाणा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक शशिकांत कोळी यांनी मध्यस्थी करून हा वाद सोडवला होता. त्याच्या मोबदल्यात शशिकांत कोळी हे तक्रारदार यांच्याकडून पैशांची मागणी करत होते.
मात्र लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे तक्रारदार यांनी धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांनी दोन पंच पाठवून या तक्रारीची खात्री केली. यानंतर पोलीस निरीक्षक मनजीतसिंग चव्हाण व प्रकाश झोडगे यांनी राजन कदम, प्रशांत चौधरी, कृष्णकांत वाडीले, महेश मोरे, शरद काटके, कैलास जोहरे आदींच्या मदतीने बेटावद गावाच्या प्रवेश द्वारा समोरील रस्त्यावर सापळा लावला. यावेळी शशिकांत कोळी यांना चार हजार रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आले. या संदर्भात नरडाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.