शालेय साहित्य आणण्यास गेलेल्या बाप-लेकाचा बोलोरेच्या धडकेत दुर्देवी अंत

ठाणे : माण तालुक्यातील पानवण फाट्याजवळ शालेय साहित्य आणण्यास गेलेल्या बाप-लेकाचा बोलोरेच्या धडकेत दुर्देवी अंत झाला. पोपट नरबट वय 52 व विश्वास नरबट वय 14 अशी मयतांची नावे आहेत. अपघातानंतर न थांबताच निघून गेलेल्या बोलेरो कारचालकाचा म्हसवड पोलिस शोध घेत आहेत.

याबाबत घटनास्थळावरुन व पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, मंगळवारी सायंकाळी 7.30 च्या दरम्यान पोपट नरबट रा. नरबटवाडी ता. माण हे दुचाकीवरून मुलगा विश्वास यास घेवून शाळेसाठी स्वाध्याय वह्या आणण्यासाठी गेले होते. मायणी रोडवर असलेल्या पानवन फाट्याजवळील दुकानातून वह्या व इतर शालेय साहित्य घेऊन नरबटवाडीकडे निघाले होते. यावेळी मायणी रोडवरील पानवन फाट्याजवळ उभ्या असलेल्या ऊसाचा ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना म्हसवडकडे भरधाव निघालेल्या बोलोरे कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता कारचालक पसार झाला. अंधार असल्याने काय झाले हे कोणाला समजले नाही मात्र जोराचा आवाज जोराचा झाला म्हणून लोक तिकडे पळाले तर रक्ताच्या थारोळ्यात मोटार सायकल चालक पोपट व मुलगा विश्वास पडला होता. विश्वास जागेवरच मयत झाला होता तर पोपट यास म्हसवड येथे उपचारासाठी आणले मात्र परिस्थिती फारच गंभीर असल्याने अधिक उपचारासाठी अकलुज येथे नेत आसताना वाटेतच पोपट नरबट यांनीही जीव सोडला.

याबाबत म्हसवड पोलिस स्टेशनला माहिती दिल्यानंतर पीएसआय विशाल भंडारे व पोलिस कर्मचारी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. घटनास्थळी धडक देवून निघून गेलेल्या बोलेरो गाडीचे मोडलेले काही भाग मिळून आले आहेत. त्यावरुन चालकाचा तपास म्हसवड पोलिस करत आहेत. दरम्यान बुधवारी सकाळी 10 वाजता नरबटवाडी याठिकाणी दोघा बापलेकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मयत पोपट नरबट यांची पत्नी आशाताई यांनी कोव्हीडमध्ये चांगले काम केले म्हणून त्यांचा कोव्हीड योध्दा म्हणून सन्मान झाला होता. त्यांचा एक मुलगा पशुवैद्यकीय कोर्स करत आहे. नरबटवाडीसह परिसरात या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here