राष्ट्रीय महामार्ग क्र. ६१ चे काम पूर्ण होण्यासाठी याचिका दाखल

राष्ट्रीय महामार्ग क्र. ६१ चे काम पूर्ण होण्यासाठी याचिका दाखल ,उच्च न्यायालयाकडून महामार्ग विभागाच्या संबंधितांना नोटिसा

पाथर्डी : कल्याण- अहमदनगर- पाथर्डी- नांदेड- निर्मल रोड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ हा गेली सहा वर्षापासून नूतनीकरणाच्या कामासाठी प्रलंबित असून गेली सहा वर्षापासून सदरील राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडल्यामुळे ५० किलोमीटरच्या टप्प्या मधील महामार्गावर अनेक स्वरूपाचे वाहन अपघात झाले असून, यामध्ये अनेक प्रवाशांना प्राणास मुकावे लागले आहे.
सामाजिक कार्यकर्ते मुकुंद भास्कर गर्जे यांनी माहिती अधिकारा अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग कामा संदर्भात माहिती जमवून रखडलेले काम तात्काळ व्हावे, यासाठी प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदने केली होती. प्रशासनाने निवेदनाची वेळीच दखल न घेतल्यामुळे मुकुंद गर्जे यांनी पंतप्रधान कार्यालय तसेच राष्ट्रीय महामार्ग मंत्रालय नवी दिल्ली मा.नितीन गडकरी यांच्याकडे देखील या संदर्भात तक्रारी दाखल केल्या होत्या. त्या अनुषंगाने पंतप्रधान कार्यालयाकडून राष्ट्रीय महामार्ग कार्यालय अहमदनगर तसेच मुंबई यांना सदर रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम तात्काळ मार्गी लावण्या संदर्भात पत्रव्यवहार देखील करण्यात आला होता. परंतु सदरील पत्र व्यवहाराला अनेक महिने उलटूनही कोणतीही कारवाई झाली नाही, म्हणून सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गर्जे यांनी यासंदर्भात आवश्यक ती माहिती मागवून संविधानिक मार्गाचा अवलंब करत, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ, औरंगाबाद येथे सदरील रखडलेल्या महामार्गाचे काम तात्काळ पूर्ण व्हावे, यासाठी जनहित याचिका दाखल केली असून उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस.व्ही.गंगापूरवाला तसेच एस. जी. दिघे यांनी २७ जानेवारी रोजी महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव राष्ट्रीय महामार्ग विभाग नवी दिल्ली, मुख्य अभियंता राष्ट्रीय महामार्ग कोकण भवन मुंबई, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग राष्ट्रीय महामार्ग नाशिक, अधिक्षक अभियंता राष्ट्रीय महामार्ग पुणे, उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग पाथर्डी, उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पाथर्डी, उपविभागीय अधिकारी पाथर्डी, जिल्हाधिकारी अहमदनगर, मुख्याधिकारी नगरपरिषद पाथर्डी, तहसीलदार पाथर्डी तसेच ठेकेदार इंगवले पाटील कन्स्ट्रक्शन पुणे यांना याचिकेवरील म्हणणे सादर करण्यासंदर्भात नोटीस काढली असून, म्हणणे सादर करण्यासाठी २४ मार्च पर्यंत वेळ देण्यात आला आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ नूतनीकरण करतांना ६ वर्षे उलटूनही राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अपेक्षित कुठलीही सुधारणा झाली नाही. या कामासाठी करंजी घाट ते फुंदेटाकळी या दरम्यानच्या महामार्गालगत असलेल्या हजारो झाडांची तोड करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्गाचे कामकाज अर्धवट असतांना देखील बडेवाडी शिवारात टोल नाका उभारून स्थानिकाकडून टोल वसुली सुरू आहे. या व अशा अनेक मुद्द्याबाबत याचिकेमध्ये चर्चा करण्यात आलेली असून पाथर्डी तालुक्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग रखडल्यामुळे परिसरातील मोहटादेवी, भगवानगड,मढी,वृद्धेश्वर,शिराळ चिचोंडी,शिर्डी,शनीशिंगणापूर अशा देवस्थानाला जाणार्‍या भाविकांना देखील दैनंदिन अपघाताला सामोरे जावे लागत असून, परिसरातील पर्यटन व उद्योग धंदे धोक्यात आल्याचे याचिकेत उल्लेखित करण्यात आले आहे. याचिकेमध्ये राष्ट्रीय महामार्ग विभागाने तात्काळ या महामार्गाचे काम पूर्ण करण्याची तसेच चुकीच्या पद्धतीने सुरू असलेली टोल आकारणी बंद करण्याची तसेच रखडलेल्या कामामुळे झालेल्या अपघातात मरण पावलेल्या प्रवाश्यांच्या मृत्यूस जबाबदार व्यवस्थे विरुद्ध कारवाई करण्यासंदर्भात निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे. गेल्या सहा वर्षापासून जाणीवपूर्वक राष्ट्रीय महामार्गाचे कामकाज रखडत ठेवल्या बाबत जबाबदार यंत्रणेविरुद्ध कारवाईची मागणी देखील करण्यात आली आहे .जनहित याचिका करता मुकुंद भास्करराव गर्जे यांच्यातर्फे अॅड.अनिरुद्ध निंबाळकर हे काम पहात असून त्यांना अॅड. रतन आढे व अॅड.हरिहर गर्जे हे सहाय्य करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here