ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर


आगामी निवडणुकीसाठी ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना मंगळवारी जाहीर झाली. मागील निवडणुकीत चार नगरसेवकांचा एक वॉर्ड होता. त्यावेळेस जी लोकसंख्या गृहीत धरण्यात आली होती तीच लोकसंख्या आता तीन वॉर्डच्या एका पॅनलसाठी गृहीत धरण्यात आल्याचे दिसत आहे.तीन वार्डचा एक प्रभाग झाल्याने नगरसेवकांच्या संख्येत 131 वरून 142 पर्यंत वाढ झाली आहे.

या प्रभाग रचनेवर 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना पडलेल्या मतांचा प्रभाव देखील दिसून आला आहे. जिथे शिवसेनेला जास्त मते होती त्या ठिकाणी नगरसेवकांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे कळवा – मुंब्रा विधानसभा मतदारसंघासह दिव्याचा विचार केल्यास येथे 47 चे थेट 52 नगरसेवक होणार आहेत.

ठाणे, कोपरी – पाचपाखाडी आणि अर्धा ओवळा माजिवडा असे मिळून यापूर्वी पालिकेवर 84 नगरसेवक निवडून जात होते. त्यात आता 6 नगरसेवकांची वाढीव भर पडणार असून येथून आता 90 नगरसेवक पालिकेवर निवडून जाणार आहेत. प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर कही खुशी कही गम अशीच काहीशी स्थिती निर्माण झाली आहे. वर्तकनगर भागात एक वॉर्ड यापूर्वी 39 हजार लोकसंख्येचा होता, तो आता 24 हजार लोकसंख्येवर आला आहे. त्यातही अनेक ठिकाणी रस्त्यांची सीमा न धरता सोसायटींच्या इमारतींची सीमा धरण्यात आल्याचेही दिसत आहे. कळवा, मुंब्य्रातील वॉर्डात देखील अनेक फेरबदल झाल्याचे दिसत आहे.

या प्रभाग रचनेमुळे सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला थेट फायदा होणार असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मताधिक्य असलेल्या ठिकाणीच नगरसेवकांचे वॉर्ड वाढले असल्यामुळे देखील भाजपला यावेळी सर्व शक्ती पणाला लावून लढावे लागणार असल्याचे चित्र आहे. याप्रमाणेच प्रभागांचे सीमांकन करत असताना रस्त्यांच्या ऐवजी सोसायटीच्या भिंतींच्या सीमा ठरल्या आहेत. त्यामुळे देखील मोठे बदल झालेले दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here