दुर्दैवी घटनेत पोलिसांना २ वर्षीय चिमुरड्याचा मृतदेह मगरीच्या जबड्यात आढळला. फ्लोरिडाच्या सेंट पीटर्सबर्गचे हे प्रकरण आहे. ज्याठिकाणी गुरुवारी सकाळी सर्वात आधी २० वर्षीय Pashun Jeffery महिलेचा मृतदेह तिच्या अपार्टमेंटमध्ये आढळला.
या महिलेची चाकू भोसकून हत्या करण्यात आली होती. याठिकाणाहून बेपत्ता मुलाचा शोध पोलिसांनी सुरू केला. महिलेची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. परंतु तपासात मुलासोबत अधिक भयंकर कृत्य झाल्याचं उघड झाले.
पशुनचा मृतदेह सापडल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी डेल होम्स पार्क येथे घरापासून जवळपास १० किमी अंतरावर २ वर्षाच्या टेलेनचा मृतदेह मगरीच्या जबड्यात असल्याचं समोर आले. अधिकाऱ्यांनी मगरीला बेशुद्ध करून मृतदेह ताब्यात घेतला, तो टेलेन असल्याची पुष्टी केली. इतक्या क्रूरपणे टेलेनचा मृतदेह आढळल्याने पोलीसही हैराण झाले.
वडिलांवर आई-लेकाची हत्या केल्याचा आरोप
सध्या या प्रकरणी टेलेनचे वडील २१ वर्षीय थॉमस मोस्ले यांच्यावर फस्ट डिग्री मर्डरचा आरोप करण्यात आला आहे. एनबीसी न्यूजनुसार पोलिसांनी जेव्हा थॉमसचा शोध सुरू केला तेव्हा तो हाताला जखम झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता.अत्यंत क्रूरपणे दोघांचा मृत्यू
कुटुंबातील लोकांनी बुधवारी संध्याकाळी ५.३० वाजता आई-मुलाला अखेरचं पाहिले होते. त्यानंतर शेजाऱ्यांनी सांगितले की, रात्री ८.३० च्या सुमारास त्यांच्या घरातून मोठमोठ्याने आवाज येत होता. परंतु पोलिसांना बोलावले नाही. या गोंधळात थॉमसच्या हाताला झालेली जखम घेऊन तो बाहेर पडला आणि त्याच्या आईच्या घरी पोहचला. परंतु सकाळी पशुन कॉल उचलत नसल्याने आईने अपार्टमेंटच्या मॅनेजरला फोन केला तेव्हा एका कर्मचाऱ्याने पशुनचा मृतदेह पाहिला. पशुनची हत्या निर्घृणपणे केली होती. सध्या पोलिसांनी या प्रकरणात तपासाला सुरुवात केली असून पशुनची हत्या कधी आणि केव्हा झाली. त्यानंतर टेलेनचा मृतदेह मगरीच्या जबड्यात कसा आला याचा शोध घेत आहे.
आईची क्रूर हत्या, चिमुरड्याचा मृतदेह मगरीच्या जबड्यात; अंगावर शहारे आणणारी घटना
119 खोट्या कंपन्या तयार करणाऱ्याला जयपूरमधून अटक; राज्य वस्तू आणि सेवा कर विभागाची कारवाई
सामान्य नागरिकांच्या पॅन आणि आधार कार्डाद्वारे 119 खोट्या कंपन्या तयार करण्याच्या आरोपावरून एका व्यक्तीला राजस्थान (Rajasthan) येथील जयपूर येथून अटक करण्यात आली.
राज्यकर उपायुक्त, सहायक आयुक्त आणि राज्यकर निरीक्षकांच्या विशेष पथकाने जयपूर पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली.
मयुर नागपाल हा बेनामी पद्धतीनं ई-मेल तयार करत असल्याचं आढळून आलं. बेनामी ई-मेल आणि खोट्या कंपन्यांशी, त्याचे थेट संबंध दिसून आले. महाराष्ट्र राज्य वस्तू आणि सेवा कर कायद्याच्या कलम 132 अन्वये हा गुन्हा ठरत असल्यानं त्यास अटक करण्यात आली. अतिरीक्त महानगर दंडाधिकारी, मुंबई यांनी आरोपीस 14 दिवसांची कोठडी सुनावली आहे.
प्रकरण नेमकं काय?
मे. माही एंटरप्रायजेस या कंपनीच्या भिवंडी आणि नाशिक येथील पत्यावर छापे टाकण्यात आले. तिथे कंपनी अस्तित्वात नसल्याचं आढळून आलं. या कंपनीनं जवळपास 22 कोटींच्या इनपूट टॅक्स क्रेडिटचा फायदा घेतल्याचं दिसून आलं. त्याचबरोबर, मे. माही एंटरप्रायजेस आणि या कंपनीसोबत व्यवहार दाखवणाऱ्या कंपन्या यांच्या ई-मेल आणि मोबाईल नंबरमध्ये काही कनेक्शन सापडलं. याप्रकरणी सायबर फॉरेन्सिक तज्ज्ञांचीही मदत घेण्यात आली. पुढील तपासासाठी अधिकाऱ्यांचं एक पथक दिल्ली आणि नोएडाला जाऊन आलं. राष्ट्रीयकृत बॅंका, UPI gateway, आणि दूरसंचार सेवा देणाऱ्या संस्थांकडून माहिती गोळा करण्यात आली. राज्यकर उपायुक्त, सहायक आयुक्त आणि राज्यकर निरीक्षकांच्या विशेष पथकानं आणि जयपूर पोलिसांच्या मदतीनं आरोपीला शोधून काढलं. जयपूरमधल्या एका बंगल्यातल्या तळघरातून आरोपी हे बेकायदेशीर काम करत असल्याचं आढळून आलं. त्याचा जबाब नोंदवण्यात आला. याप्रकारे तयार केलेल्या खोट्या कंपन्यांची संख्या पुढील तपासात वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
करचुकवेगिरी करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींच्या विरोधातील राज्य वस्तू आणि सेवा कर विभागाच्या प्रयत्नांना या कारवाईमुळे मोठं यश मिळालं आहे. अन्वेषण शाखेच्या राज्यकर निरीक्षकांनी यात मोठं योगदान दिलं आहे. आर्थिक वर्ष 2022- 23 मध्ये ,राज्य वस्तू आणि सेवा कर विभागानं केलेली ही 73वी अटक आहे. या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र शासन तसेच उत्तर प्रदेश आणि राजस्थान शासनाच्या यंत्रणांशी यशस्वीपणे समन्वय साधून करण्यात आला. यातील लाभलेले यश हे “एक राष्ट्र, एक कर, एक बाजार” या संकल्पनेसंदर्भात उत्तम उदाहरण असल्याचं राज्य वस्तू आणि सेवा कर विभागानं नमूद केलं आहे
बसमधून उतरताना महिलेचे १.०५ लाखाचे मंगळसुत्र पळविले
पतीसोबत भंडारावरून नागपूरला आलेली महिला बसमधून खाली उतरत असताना तिच्या पर्समधील मंगळसुत्र आणि रोख १५०० असा एकुण १ लाख ६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात आरोपीने पळविला.
ही घटना पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत भंडारा रोडवरील पारडी बसस्टॉप येथे शनिवारी रात्री २.३० वाजताच्या सुमारास घडली. पिंकी रितेश तमाने (३०, आदर्शनगर दिघोरी उमरेड रोड) असे या महिलेचे नाव आहे. त्या आपल्या पतीसोबत बसने भंडावरून नागपूरला आल्या. पारडी बसस्टॉपवर त्या बसमधून खाली उतरत असताना बसमध्ये गर्दी होती.
बसमधील गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात आरोपीने त्यांची नजर चुकवून त्यांच्या पर्समधील सोन्याचे मंगळसुत्र आणि रोख १५०० असा एकुण १ लाख ६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पारडी ठाण्याचे उपनिरीक्षक क्रिष्णा वाघ यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.
सातारा पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या बनावट सहीचा वापर; एकावर गुन्हा दाखल
सातारा पालिकेत अनेक घडामोडी घडत असतात. मात्र, त्या काही काळानंतर उघडकीस येतात. असाच एक प्रकार सध्या उघडकीस आला असून या ठिकाणी जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने सातारा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या बनावट सहीचाच वापर करण्यात आला आहे.
मुख्याधिकाऱ्यांची बनावट सही करून ना-हरकत दाखला तयार करून तो न्यायालयात सादर करण्यात आला. याप्रकरणी कोल्हापुरातील नेचर इन नीड सीबीएमडब्ल्यूटीएफ संस्थेच्या एकावर सातारा शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आप्पासो बळवंत जाधव (रा. कर्जगार चेंबर्स, इंजिनिअरिंग असोसिएशन समोर, शिवाजीनगर, कोल्हापूर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत सातारा पालिकेतील आरोग्य विभाग प्रमुख प्रकाश लक्ष्मण राठोड यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेलय माहितीनुसार, कोल्हापुरातील नेचर इन नीड सीबीएमडल्ब्यूटीएफ संस्थेस जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन करण्यासाठी असोसिएशन ऑफ हाॅस्पिटल ओनर्स सातारा यांच्या मालकीचा सोनगावमधील कचरा डेपो प्लांट चालविण्यासाठी देण्यात आलेला होता. संबंधित प्लांट चालविण्यासाठी सातारा पालिकेचे मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या ना-हरकत प्रमाणपत्रामध्ये त्यांनी फेरफार केली.
तसेच सातारा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या बनावट सहीचा दाखला तयार करून तो न्यायालयातही सादर केला. यामध्ये सातारा पालिकेने वीस वर्षे मुदतवाढ दिली आहे, असे नमूद केले. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर सातारा पालिकेच्या वतीने तक्रार नोंदविण्यात आली. त्यानंतर नेचर इन नीड संस्थेच्या पदाधिकाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे हे करीत आहेत.
सोलापूर बाजार समितीत ३ एप्रिलपासून कांदा अनुदानासाठी अर्ज स्वीकारणार!
कांद्याचा दर अचानकपणे कोसळल्यामुळे राज्य शासनाने प्रतिक्विंटल साडेतीनशे रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार सोलापूर बाजार समितीत दि.
३ एप्रिल ते २० एप्रिलपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे, अशी माहिती उपसभापती श्रीशैल नरोळे यांनी दिली.
राज्यातील सरकारी व खाजगी बाजार समितीत १ फेब्रुवारी ते ३१ मार्चपर्यंत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना २०० क्विंटलपर्यंत प्रतिक्विंटल साडेतीनशे रुपये अनुदान राज्य शासनाकडून मिळणार आहे. त्यासाठी प्रत्येक बाजार समितीकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. बाजार समितीकडे प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून जिल्हा उपनिबंधकांकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. जिल्हा उपनिबंधक मार्फत राज्य शासनाकडे अनुदानासाठी अहवाल देण्यात येणार आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सोमवार, दि. ३ एप्रिलपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होत आहे. त्यासाठी बाजार समितीच्यावतीने स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. दि. २० एप्रिलपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. मुदत संपल्यावर दाखल होणाऱ्या अर्जांची दखल घेतली जाणार नाही. कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर कांद्याची नोंद असणे आवश्यक आहे. त्यासोबत आधार कार्ड बाजार समितीतील कांदापट्टी देणे बंधनकारक असल्याचेही सांगण्यात आले.
गिरणीच्या पट्ट्यात अडकून जखमी झालेल्या मालकाचा मृत्यू
पिठाच्या गिरणीतील पट्ट्यात पाय अडकून गंभीर जखमी झालेल्या मालकाचा कोल्हापूर येथे उपचारादरम्यान शनिवारी (२ एप्रिल) रात्री मृत्यू झाला.
ही घटना १ एप्रिल राोजी सायंकाळी ७ वाजता रत्नागिरी शहरातील रामआळी येथे घडली होती. अनिल भार्गव पोटफोडे (५७) असे त्यांचे नाव आहे.
शहरातील तेली आळी येथे अनिल पोटफोडे यांचे घर आहे. त्यांची रामआळी येथे पीठ व मसाला गिरण आहे. शनिवारी सायंकाळी गिरणीमध्ये काम करत असताना गिरणीच्या पट्ट्यात त्यांचा पाय अडकला. त्यानंतर ते मशीनमध्ये खेचले गेले. यामध्ये त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली होती.
या घटनेनंतर परिसरातील व्यावसायिकांनी त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले. तिथे उपचार सुरू असतानाच त्यांचा मध्यरात्री मृत्यू झाला. रविवारी त्यांचा मृतदेह रत्नागिरीत आणण्यात आला.
तो पाठीत खुपसलेल्या चाकुसह पोहचला रूग्णालयात, मग डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांची सुरु झाली पळापळ
उत्सवाचे फलक लावण्यावरून चौघांनी वाद घातला. काय प्रकार आहे, हे पाहण्यासाठी घराबाहेर आलेल्या युवकावर चाकूने हल्ला केला. पाठीत चाकू खुपसातच त्या युवकाने चाकू हाताने घट्ट पकडून ठेवला.
त्यामुळे हल्लेखोराला दुसरा वार करण्याची संधी मिळाली नाही. तेवढ्यात कुटुंबातील इतर सदस्य धावून आले, त्यांनी जखमीला चाकूसह थेट शासकीय रुग्णालयात (government hospital) दाखल केले. हा थरार यवतमाळच्या (yavatmal) लोहारा येथील शिवाजीनगरात (lohara shivajinagar) घडला. दीक्षित विजय हिरणवाडे (३८, रा. रामनगर लोहारा) असे चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. जखमी दीक्षितला तातडीने दुचाकीवरून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भांडण दुसऱ्यांचे पाहण्यासाठी गेलेल्या तरुणावर चाकूचा हल्ला झाला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. नेमका वाद कशावरुन झाला याची अद्याप माहिती मिळालेली नाही. परंतु पोलिस चौघांचा शोध घेत असून त्यांना ताब्यात घेतल्यानंतर कारण स्पष्ट होईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. हल्ला झालेल्या तरुणाची अवस्था गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याच्या पाठीच्या खालच्या भागात चाकू रुतला आहे. बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रियेला सुरुवात केली. या प्रकरणात चौघांवर संशय व्यक्त केला जात असून, घटनेचा फोटो सुद्धा व्हायरला झाला आहे.
तरुणाची प्रकृती गंभीर असून त्याला थोडासा आराम मिळाल्यानंतर पोलिस त्याची सुध्दा चौकशी करण्यात येणार आहे. तरुण नेमके कोणत्या उत्सवाचे फलक लावत होते याबाबत सुध्दा माहिती मिळालेली नाही. त्याचबरोबर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. त्याचबरोबर या प्रकरणाची तिथं असलेल्या लोकांच्याकडून माहिती सुध्दा घेतली आहे. कदाचित जुन्या वादातील प्रकरण असावं अशी पोलिसांना दाट शक्यता आहे.
येरवडा कारागृहातील कैद्यांमध्ये हाणामारी; दोन न्यायालयीन कैदी जबर जखमी
येरवडा कारागृहात (Yerwada Jail) कैद्यांच्या दोन गटात जोरदार हाणामारी झाली. त्यात दोन न्यायालयीन कैदी जबर जखमी झाले.
हरीराम गणेश पांचाळ (Hariram Ganesh Panchal) आणि मुसा अबू शेख (Musa Abu Sheikh) अशी जखमी झालेल्या न्यायालयीन बंदींची नावे आहेत.
याबाबत कारागृह शिपाई एकनाथ गांधले (Eknath Gandhale) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २१९/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी न्यायालयीन कैदी अर्जुन बाजीराव वाघमोडे (Arjun Bajirao Waghmode), रोहन रामोजी शिंदे (Rohan Ramoji Shinde), साहील लक्ष्मण म्हेत्रे (Sahil Laxman Mhetre), ऋषिकेश हनुमंत गडकर (Rishikesh Hanumant Gadkar), ओंकार नारायण गाडेकर (Omkar Narayan Gadekar), मंगेश शकील सय्यद (Mangesh Shakeel Syed) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार येरवडा कारागृहातील किशोर विभागातील बॅरक क्रमांक २च्या जवळील हौदाजवळ ३१ मार्च रोजी सकाळी पावणेदहा वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी आळंदी येथे दोन गटात झालेल्या भांडणात अर्जुन वाघमोडे, ओंकार गाडेकर व इतरांना अटक केली होती. त्यानंतर त्यांची न्यायालयीन कैदी म्हणून येरवडा कारागृहातील किशोर विभागात ठेवण्यात आले आहे. या विभागात इतरही न्यायालयीन कैदी आहेत. हरीराम पांचाळ व मुसा अबू शेख यांच्याशी या आरोपीची भांडणे झाले होती. या भांडणाचा राग मनात धरुन अर्जुन वाघमोडे व इतरांनी तेथील प्लास्टिक बकेट, भाजी वाढण्याचे वरगाळे याच्या सहाय्याने दोघांना बेदम मारहाण केली. हे कारागृह शिपायांना समजल्यानंतर त्यांनी पांचाळ व शेख यांना तातडीने तेथून बाजूला नेले. दोघांवर उपचार करण्यात आले असून येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतकऱ्याचा दाखला आता तालुका कृषी अधिकारी देणार..
राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये महिला, तसेच इतर शेतकरी सदस्यांना सहभागी करून घेण्यात येत असलेली मोठी तांत्रिक अडचण कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दूर केली आहे.
शेतकऱ्याचा दाखला आता तालुका कृषी अधिकाऱ्याने द्यावा, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये (एफपीसी) भागधारक म्हणून सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना दाखला द्यावा लागतो. हा दाखला मिळविण्यात सध्या शेतकऱ्यांना विविध टप्प्यांवर अडचणी येत आहेत.
दाखला देण्याची पद्धत सोपी झाल्यास व असा दाखला प्रत्यक्ष कृषी अधिकाऱ्यांनी दिल्यास शेतकऱ्यांची वणवण थांबू शकेल, असे आयुक्तांच्या निदर्शनास आले.
त्यामुळे यापुढे शेतकरी असल्याचा दाखला तालुका कृषी अधिकाऱ्यांनी द्यावा, असे आदेश आयुक्तांनी जारी केले आहेत. अर्थात, हा दाखला केवळ ‘एफपीसी’मध्ये भागधारक म्हणून सहभागी होण्याच्या कामापुरताच मर्यादित असेल. या दाखल्याचा वापर इतर कामांसाठी करता येणार नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
राज्यात ७९ टक्क्यांच्या पुढे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत. त्यांना शाश्वत शेतीच्या प्रवाहात आणण्यासाठी ‘एफपीसी’मध्ये सामील करून घेणे हा एक प्रभावी उपाय राज्य शासनाला वाटतो आहे.
मात्र त्यांना तसेच महिला शेतकऱ्यांना भागधारक करून घेण्यात अडचणी येतात. शेतकरी असल्याचा दाखला मिळत नाही.
बहुतेक गावांमध्ये महिला शेतकऱ्यांच्या नावे सातबारावर जमीन नाही. या महिलांना कंपनीत भागधारक करून घ्यायचे असल्यास शेतकरी असल्याचा दाखला द्यावा, अशी सक्ती कंपनी निबंधकांकडून केली जाते. त्यामुळे कृषी विभागाकडे तक्रारी येत होत्या.
अखेर, आयुक्तांनी ही समस्या निकालात काढली. राज्यातील एफपीसी क्षेत्रातून आयुक्तांच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे.
डॉ.संजय बोरुडे यांना वैनाकाठ पुरस्कार जाहीर
डॉ.संजय बोरुडे यांना वैनाकाठ पुरस्कार जाहीर
भंडारा : युगसंवाद साहित्य व सांस्कृतिक चळवळ भंडारा अंतर्गत वैनाकाठ फाउंडेशनतर्फे २०२१ २०२२चे साहित्य, सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठीचे पुरस्कार रविवारी भंडारा कार्यकारणीच्या सभेत जाहीर करण्यात • आले. पाच हजार रुपये रोख, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, महावस्त्र असे पुरस्काराचे स्वरूप असेल. यात साहित्य क्षेत्रातील सहा पुरस्कारांकरिता महाराष्ट्र तसेच बृहन्महाराष्ट्रातील लेखकांकडून प्रवेशिका मागविल्या होत्या, तर सामजिक व शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार फाउंडेशनची कार्यकारिणी सहमतीने जाहीर करणार होती. वाङ्मय पुरस्कारांमध्ये *’डॉ. अनिल नितनवरे समीक्षा* *पुरस्कार’ अहमदनगर येथील ‘प्रकाश किनगावकर यांची कविता’ साठी डॉ. संजय बोरुडे यांना*, ‘ वाङ्मय क्षेत्रातील पुरस्कारांसाठीची ग्रंथ निवड डॉ. गिरीश सपाटे यांच्या अध्यक्षतेत, डॉ. सुरेश खोब्रागडे, प्रा. भगवंत शोभणे, डॉ. रेणुकादास उबाळे, अमृत बनसोड यांच्यासह कवी व चित्रकार प्रमोदकुमार अणेराव या तज्ज्ञांच्या समितीने केले. दि. १६ एप्रिल रोजी पुरस्कारप्रदान सोहळा घेण्यात येईल, असे फाउंडेशनचे सचिव विवेक कापगते यांनी कळविले आहे.
डॉ. संजय बोरुडे हे नगर मधील प्रथितयश लेखक असून त्यांचा ‘प्रकाश किनगावकर यांची कविता ‘ हा समीक्षा ग्रंथ संगमनेर येथील ‘साहित्याक्षर प्रकाशन ‘ च्या वतीने प्रकाशित झाला आहे .या यशाबद्दल ‘ हिंदी अनुसंधान प्रसार केंद्र, महाराष्ट्र राज्य ‘ , ‘धन्वंतरी वाचनालय , जेऊर ‘ , ‘ अहमदनगर साहित्यिक वैभव ‘ इ. संस्थांनी अभिनंदन केले आहे .