शहरातील क्रांती चौक परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण १८ फेब्रुवारी रोजी


औरंगाबाद : शहरातील क्रांती चौक परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण १८ फेब्रुवारी रोजी रात्री १२ वाजता करण्यात येणार आहे.
[मागील अनेक दिवसांपासून राज्यकर्ते आणि शिवप्रेमी यांच्यात पुतळ्याच्या अनावरणावरून शाब्दिक संघर्ष सुरू होता, त्याला मंगळवारी पूर्णविराम देण्यात आला असला, तरी मध्यरात्रीच्या मुहूर्तावरून शिवजयंती उत्सव समिती, शिवप्रेमी जनतेतून तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.

१८ रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे ऑनलाईन, तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. देशातील सर्वाधिक उंचीचे शिवछत्रपतींचे शिल्प क्रांती चौकात असून, ते पुण्यातील शिल्पकार दीपक थोपटे यांनी घडविले आहे; तर चबुतरा व परिसराचे सौंदर्यीकरण महापालिकेने केले आहे, असे पालकमंत्री देसाई यांनी कळविले आहे.

डीजेला परवानगी
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी १५ फेब्रुवारी रोजी विशेष आदेशानुसार डीजे, साऊंड-सिस्टीम, वादक, कलाकार व लग्नसमारंभातील वाद्यांसाठी परवानगी दिली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्या कलाकारांनाच वाद्यवृंदांच्या पथकात सहभागी होता येईल.

सरकारला वेळ नसल्यामुळे हा मुहूर्त
सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दिवसा अनावरण करण्यासाठी वेळ नसल्याने हा मुहूर्त काढल्याचे दिसते आहे. अठरापगड जातीचे हे दैवत असून, दिवसा अनावरण केले असते तर आनंद द्विगुणित झाला असता. सरकारच्या या निर्णयामुळे शिवप्रेमी जनता त्यांना माफ करणार नाही.
– बबन डिडोरे, संस्थापक-अध्यक्ष, नवीन औरंगाबाद शिवजयंती महोत्सव समिती

ना ढोल, ना ताशे, ना शिवप्रेमी
ना ढोल, ना ताशे, ना शिवप्रेमी, फक्त शासकीय नियमांचे पालन करीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करणे हे खूप दुर्देवी आहे. शिवप्रेमींनी ज्या पुतळ्यासाठी तीन वर्षे वाट पाहिली, त्यांचा आता भ्रमनिरास होणार आहे. साजेसा आणि तोलामोलाचा कार्यक्रम होणे अपेक्षित आहे. वेळेचा पुनर्विचार मनपाने करावा, अशी अपेक्षा आहे.
– प्रा. मनोज पाटील, कार्याध्यक्ष, जिल्हा शिवजयंती महोत्सव समिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here