तेलंगणा राज्यात १ रुपये किलो दराने मिळणाऱ्या तांदळाची महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात तस्करी


 

चंद्रपूर : लगतच्या तेलंगणा राज्यात १ रुपये किलो दराने मिळणाऱ्या तांदळाची महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात तस्करी होत आहेतेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील विरूर स्थानक हे गाव या तस्करीचे मुख्य केंद्र बनले आहे. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ या जिल्ह्यात या तांदळाची मोठय़ा प्रमाणात अधिकच्या दराने विक्री होत आहे. काही राइस मिलमध्ये पॉलिश करून व नवीन लेबल लावूनही हा तांदूळ बाजारात आणला जात आहे.

तेलंगणात तथा चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असताना मद्य, सुगंधी तंबाखू तथा गाय व बैलांची तस्करी व्हायची. आजही तस्करीचा हा प्रकार या दोन राज्यांच्या सीमावर्ती भागात जोरात सुरू आहे. आता त्यात तांदूळ तस्करीची भर पडली आहे. महाराष्ट्राच्या सीमा भागातील साडेबारा गावे तेलंगणा व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या शासकीय योजनांचा लाभ घेतात. या साडेबारा गावात तेलंगणा राज्याचा स्वस्त तांदूळ एक रुपयात मिळतो. तो रेल्वे तथा खासगी वाहनातून विरूर स्टेशन, लक्कडकोट मार्गे चंद्रपूर, गडचिरोली, राजुरा, ब्रम्हपुरी, वडसा देसाईगंज, भंडारा, गोंदिया, यवतमाळ या भागांत अधिकच्या दराने विकला जातो. महाराष्ट्र व तेलंगणा या दोन राज्यांच्या सीमेवर विरूर स्टेशन हे शेवटचे गाव आहे. पॅसेंजर गाडीच्या माध्यमातून तेलंगणातून तांदूळ तस्कर या भागात तांदळाचे कट्टे घेऊन येतात, रेल्वेस्थानकावर चारचाकी वाहने लावून तिथेच तांदूळ वाहनांमध्ये भरला जातो. त्यानंतर हा विविध भागात पाठवला जातो. एक रुपया किलोचा तांदूळ पॅकिंग बदलून दुसऱ्या पिशवीमध्ये भरून विरूर (स्टे.) येथील रेल्वे स्टेशनवर उतरवला जातो. नंतर हाच तांदूळ ब्रह्मपुरी, गोंदिया येथे दुसऱ्या पिशवीत भरून लेबल लावून जादा दराने विकला जातो. या व्यवसायात काही राईस मिलचा देखील सक्रिय सहभाग असल्याची चर्चा या भागात आहे. राईस मिलमध्ये या तांदळाला पॉलिश केले जाते. त्यावर ब्रँडचे लेबल लावून नवीन पॅकिंग करून १५ ते २० रुपये किलो दरानेही हा तांदूळ बाजारात विकला जात आहे. या भागातील अनेक धान्य व्यापारी तथा बेरोजगार युवक तस्करीत गुंतले आहेत. तेलंगणात गरिबांसाठी असलेला हा तांदूळ महाराष्ट्रात १५ ते २० रुपये किलो दराने विकला जात आहे.

अनेक जिल्ह्यात जाळे

मंचेरियाल, जयशंकर भोपणपल्ली येथून थेट गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथे हा तांदूळ येतो. देसाईगंजमार्गे राज्यात विकला जातो. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील पुरवठा अधिकारी हे सतर्क नसल्याने हा कोटय़वधींचा गोरखधंदा राजरोसपणे सुरू असल्याचा आरोप होत आहे. दोन्ही जिल्ह्यातील राईस मिल तस्करीचे मुख्य केंद्र आहे. या राईस मिलमध्ये प्रक्रिया व भेसळ करून एक रुपया किलोचा तांदूळ भरमसाट दरात विकला जात आहे. हाच तांदूळ देसाईगंजमार्गे भंडारा व गोंदिया या दोन जिल्ह्यांपर्यंत पोहचवला जात आहे.

या सीमावर्ती भागात मोठय़ा प्रमाणात सागवान लाकडाची तस्करी होते. त्यासोबतच वन्यजीवांच्या तस्करीचा देखील हा भाग केंद्रस्थान बनला आहे. तसेच या भागातील वैनगंगा, पैनगंगा, गोदावरी या भागातील नदीपात्रातून वाळूची मोठय़ा प्रमाणात तेलंगणात तस्करी होते. वाळू तस्करांनी तर या भागातील नदी व मोठे नाले उद्ध्वस्त करून ठेवले आहेत.

तेलंगणातून महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात मोठय़ा प्रमाणात तांदूळ येत आहे ही वस्तुस्थिती आहे. हा तांदूळ अतिशय कमी दराचा आहे. २०१६ च्या एका आदेशानुसार वाहतुकीला बंदी नाही. त्यामुळे तेलंगणा राज्यातून येणाऱ्या तांदळावर कुठलीही कारवाई करता येत नाही. महाराष्ट्रातील स्वस्त धान्य दुकानात हा तांदूळ विक्री होत असल्याचे दिसून आल्यास कारवाई करता येते. मात्र अजूनपर्यंत तशा तक्रारी नाहीत. अशा परिस्थितीत आमचे हात बांधलेले आहेत. तहसीलदार यांनादेखील कारवाई करण्यासाठी तक्रार आवश्यक आहे. तक्रारच नसेल तर कारवाई कुणावर करणार हादेखील प्रश्न आहे. – शालिकराम बऱ्हाडी, जिल्हा पुरवठा अधिकारी, चंद्रपूर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here