चार शाळकरी मुलांचा मृत्यू

बीड : वाळू माफियांनी वाळू चोरीसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून चार शाळकरी मुलांचा मृत्यू झालेली घटना संपते न संपते तोच आता खून अन् खुनी हल्ल्यांच्या घटनांचा आलेख वाढत आहे. ‘क्राईम कंट्रोल’मध्ये म्हणणाऱ्या यंत्रणेने आता सगळं चांगलंय फक्त खून आणि खूनी हल्ले सुरुयेत असेच म्हणायला हवेमागील तीन दिवसांत एकट्या परळी शहर व परिसरात खुनाच्या चार घटना घडल्या आहेत. तर, केज तालुक्यात पुन्हा खुनाची एक घटना समोर आली आहे. खुनाचे सत्र एकीकडे सुरु असताना तलवारीने वार, भर कार्यालयात गोळीबार अशाही घटना सुरु आहे. पोलिस दलाकडून क्राईम कंट्रोलमध्ये असल्याचे जोरकसपणे सांगितले जात असले तरी मग हे नेमकं काय सुरुय आणि या अपयशाचा धनी कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.

चोऱ्या, मारामारीच्या घटना तर वाढल्याच आहेत. मात्र, स्त्री अत्याचार, बलात्कार, दरोडे, प्राणघातक हल्ले आणि खुनांच्या घटनांचा आलेखही वाढत आहे. मात्र, पोलिस दलाकडून तुलनात्मक आकडेमोड करुन ‘क्राईम कंट्रोल’मध्ये असल्याचे नेहमीच सांगितले जाते. मग सगळं कसं चांगलं अन् सुरळीत असताना फक्त खून आणि खुनी हल्ले तेवढे सुरु आहेत, असेच म्हणायचे बाकी राहतेय.

वाळूचा विषय महसूल आणि पोलिस या दोघांत येतो. गुटखा अन्न व औषधी प्रशासन व पोलिसांच्या अखत्यारित येतो. तसे या दोन्ही गोष्टी जिल्ह्यात कमी नाहीत. काहीच दिवसांपूर्वी गेवराई तालुक्यात वाळू माफियांनी खोदलेल्या खड्ड्यात चार शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. यानंतर पोलिस व महसूल यंत्रणा हालली. काही उपाय योजनाही करण्यात आल्या आहेत. गुटख्याच्याही कारवाया होत आहेत. मात्र, गंभीर गुन्ह्यांच्या घटना थांबायचे नाव घेत नाहीत.

चारच दिवसांपूर्वी परळीजवळील जिरेवाडीत वृद्ध बहिण भावांचा खून झाल्याचे समोर आले. त्यानंतर लागलीच परळी शहरात एका महिलेचा खून करुन तिच्या मुलीवरही प्राणघातक हल्ला झाला. शनिवारच्या (ता. २६) घटनेनंतर पुन्हा रविवारी (ता. २७) शहराजवळील धारावती तांडा येथे पुरुषाचा मृतदेह आढळला आहे. याच दिवशी केज तालुक्यातील आडस येथे खुनाची घटना घडली आहे. तसेच गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे तलवारीने हल्ल्याची घटना घडली. तर, याच्या दोन दिवसांपूर्वी गेवराई तालुक्यातच झाडावर लटकलेले शीर आणि धड खाली पडलेल्या अवस्थेत आढळले होते.

बीड शहरातील हायप्रोफाईल गोळीबार, कुकरीने हल्ल्याचा प्रयत्न, लूट अशाही घटना समोर आल्या. त्यामुळे नेमकं क्राईम कंट्रोल असताना हे चाललंय काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here