
बीड – लातूर-बीड रस्त्यावर कुंबेफळ जवळ चालत्या कारने पेट घेतल्याची घटना घडली. या घटनेत कार जळून खाक झाली आहे. कारमध्ये पाच जण प्रवास करत होते. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, लातूर येथील चार्टर्ड अकाउंटंट गणेश महापूरकर हे आपल्या कुटुंबासोबत सकाळीच लातूरहून केजकडे निघाले होते. साधारण शंभर किलोमीटर आल्यानंतर कुंबेफळ गावाच्या नजीक कारच्या एसीतून धूर निघत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे महापूरकर यांनी तत्काळ कार रस्त्याच्या बाजूला घेतली आणि कारमधील सर्वांना खाली उतरण्यास सांगितले. गणेश महापूरकर यांच्यासोबत इतर चार जण कारमधून खाली उतरले आणि अवघ्या काही सेकंदामध्ये कारने पेट घेतला. दैव बलवत्तर म्हणूनच यावेळी कार लॉक झालेली नव्हती.
अर्धा ते पाऊन तास ही आग अशीच धुमसत होती. यात संपूर्ण कार जळून खाक झाली. केवळ नशीब बलवत्तर म्हणून वेळीच प्रसंगावधान साधल्याने गणेश महापूरकर यांच्यासोबतच इतर चार जणांचे प्राण वाचले. दरम्यान, ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, याची अद्याप माहिती मिळाली नाही.