कुडाळात ‘पुणे पॅटर्न’चा घनकचरा प्रकल्प; बायोगॅससह वीज निर्मिती होणार

0
84
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

कुडाळ – पुण्यातील मुळशी, पिरंगुट व भोसरी येथील प्रकल्पाच्या धर्तीवर येथे घनकचरा निर्मूलन प्रकल्प राबविण्यासाठी महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी प्रयत्न सुरु केले आहेत. येथील सर्वांगीण विकासात भर टाकणारा हा प्रकल्प ठरणार आहे.

दररोज तीन टन ओला, सुका कचरा निर्मुलन होण्याच्या दृष्टीने पावले टाकली आहेत. सव्वा कोटीचा हा प्रकल्प असून बायोगॅससह वीज निर्मितीसुध्दा होणार आहे. भविष्यात सीएनजी प्रकल्पासाठी सुध्दा या महाविकास सत्ताधाऱ्यांनी पुणे येथील तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली ठोस पावले उचलली आहेत.

कुडाळ हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असून सर्व सुविधांनी परिपुर्ण आहे. मात्र, येथे कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गेली काही वर्षे सातत्याने जटील होत चालला आहे. कचरा निर्मुलन प्रकल्पबाबत अनेक उपाययोजना करण्याच्या दिशेने सत्ताधारी व विरोधक या दोघांची सत्ता असताना बरेच प्रयत्न केले.

मात्र, हा प्रकल्प मार्गी लागत नव्हता. अखेर सत्ताधारी महाविकास आघाडीने येथील डॉ. प्रसाद देवधर यांच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील मुळशी, पिरंगुट व पिंपरी चिंचवड येथील भारतातील पहिल्या अँग्रो गॅस प्लांटला कुडाळ नगरपंचायत नगरसेवक, अधिकारी यांनी अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने भेट दिली. तेथे कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून सीएनजी गॅस बनविला जातो, याबाबत माहिती जाणून घेतली.

या अभ्यास दौऱ्यात कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष अक्षता खटावकर, उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, नगरसेवक किरण शिंदे, उदय मांजरेकर, सई काळप, श्रेया गवंडे, श्रुती वर्दम, ज्योती जळवींसमवेत मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद नातू, नगर अभियंता विशाल होडावडेकर, अधिकारी संदिप कोरगांवकर, नागरिक राकेश वर्दम, हनुमंत हेरेकर आदी सहभागी झाले होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दररोज गोळा होणाऱ्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी कचरा प्रक्रिया युनिट तयार करण्याचे काम सुरु केले आहे. याबाबत तेथील अधिकाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले, ‘यातून महानगरपालिकेला आर्थिक फायदा काहीही होणार नाही. पण, कचऱ्याचे भलेमोठे डोंगऱ्यांमुळे यापुढे शहराचे विद्रुपीकरण होणार नाही.’

त्यामुळे अशा प्रकारच्या प्रकल्पाची आज कुडाळमध्ये गरज असल्याचे लक्षात आले. त्यासाठी सत्ताधाऱ्यांनी कुडाळचा कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. या प्रकल्पाबाबत पुणे येथे संतोष गोंधळेकर व अवणी एंटरप्रायझेस डोंबीवलीचे मुख्य अधिकारी अजित कुढे यांचे मार्गदर्शन लाभले.

‘कुडाळच्या वैभवात भर टाकणारा हा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी सर्वाचे योगदान महत्वाचे आहे. दिवसा तीन टन कचरा उपलब्ध असून हा प्रकल्प उभा करण्यासाठी सव्वा कोटी निधीची गरज आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून बायोगॅस प्रकल्प सुरू होऊ शकतो. भविष्यात वीजनिर्मितीसाठी पावले उचलली जातील. पुणे येथील या प्रकल्प अभ्यास दौऱ्यात आम्हाला सीएनजीबाबतही परिपुर्ण मार्गदर्शन मिळाले. हा सुध्दा प्रकल्प भविष्यात सर्व नगरसेवक, नगरपंचायत प्रशासन व नागरिक यांच्या माध्यमातून सुरू करण्याच्या दृष्टीकोनातून निश्चितच पावले टाकली जातील.’

कुडाळ नगरपंचायत हद्दीत गेली बरीच वर्षे कचरा प्रश्न जटील आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पुणे येथील प्रकल्प पाहण्यात आला. त्याधर्तीवर बायोगॅस प्रकल्प व वीजनिर्मिती हे दोन महत्वाचे उपक्रम राबविले जातील. सर्व नगरसेवकांची व निधी उपब्धतेसाठी शासनाचे सहकार्य महत्त्वाचे आहे. सात ते आठ महिन्यांत हा प्रकल्प उभा राहू शकतो. नगरपंचायतला चांगले उत्पन्न मिळू शकते. सीएनजी हा प्रकल्पही सर्वांच्या सहकार्याने योग्य नियोजन झाल्यास यशस्वी होऊ शकतो.’

– अरविंद नातू, मुख्य कार्यकारी अधिकारी

‘कचरा निर्मुलन प्रकल्प सर्वांच्या सहकार्याने निश्चितच पुर्ण करू. पुणे येथे केलेल्या अभ्यास दौऱ्याचे फलित निश्चितच सार्थकी लावू. हा कचरा निर्मुलन प्रकल्प कुडाळच्या सर्वागीण विकासात भर टाकणारा आहेच शिवाय नगरपंचायतचे उत्पन्न वाढविणारा आहे. तो होण्यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वाचे सहकार्य महत्त्वाचे आहे. विकासासाठी राजकारण असू नये.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here